लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पोराबाळांना घेऊन लोकल प्रवास करणाऱ्या महिलांमुळे लोकल गर्दीत भर पडत असल्याचे आढळून आल्याने रेल्वे प्रशासनाने लहान मुलांना प्रवास करण्यास मनाई करणारे आदेश काढले आहेत. नोकरदार महिलांच्या सोयीसाठी ठरावीक वेळेत लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती.

मुलाबाळांना घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांमुळे लोकल गर्दी वाढली आहे. रात्री उशिरा महिलांचे डब्बे त्यामुळे खच्चून भरलेले असतात. ही गर्दी टाळण्याकरिता रेल्वेला हे कठोर धोरण अवलंबवावे लागले आहे. टाळेबंदीत पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, पालिका व सरकारी कर्मचाऱ्यांनाच अत्यावश्यक सेवा कर्मचारी म्हणून लोकल प्रवासाची परवानगी होती. राज्य सरकार व रेल्वे प्रशासनाने हळूहळू विविध श्रेणींतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली. त्यात सर्वच महिलांना २१ ऑक्टोबरपासून ठरावीक वेळेत लोकल प्रवासाची परवानगी मिळाली. त्यामुळे नोकरीधंद्यानिमित्त घराबाहेर पडणे आवश्यक असलेल्या महिलांची सोय झाली. अत्यावश्यक सेवेतील महिला कर्मचारी वगळता अन्य महिलांना सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० पर्यंत आणि सायंकाळी ७.०० नंतर प्रवासाची परवानगी सरकारने दिली आहे. परंतु काही महिला खरेदीच्या किंवा नातेवाईकांना भेटण्याच्या निमित्ताने सर्रास लहान मुलांना घेऊन प्रवास करताना आढळून येत आहे. टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी गरज असेल तर प्रवास करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. करोनाकाळात लहान मुलांना घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांमुळे धोका वाढू शकतो, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

करोनाकाळात लहान मुलांना घेऊन महिला लोकल प्रवास करत आहे. ही बाब गंभीर आहे. फक्त महिलांसाठी प्रवास असल्याचे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केलेले आहे. त्यानुसार महिलांसोबत लहान मुले प्रवास करू शकत नाहीत. – के. के.अशरफ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुकक्त, मध्य रेल्वे सुरक्षा दल

प्रवासी संख्येत वाढ

दिवसेंदिवस लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. विविध श्रेणींना लोकल प्रवासाची परवानगी दिल्यानंतर सर्वच महिलाही लोकल प्रवास करू लागल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबरच प्रवास करणाऱ्यांमध्ये अन्य महिलाही असून त्यामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेरून एकूण प्रवास करणारी प्रवासी संख्या १२ लाखांच्याही पुढे गेली आहे.