चौदा वर्षांखालील बालगोविंदांच्या मानवी मनोऱ्यांमधील बंदीमुळे भविष्यात दहीहंडीचा थरार कमी होणार असून लहान मुलांच्या बंदीच्या या ‘भारा’खाली गोविंदा पथके चांगलीच वाकणार आहेत. त्यामुळे, या निर्णयाचे तीव्र पडसाद गोविंदा मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागले आहेत.
लहान मुले वजनाने हलकी असल्याने दहीहंडीच्या आठ ते नऊ थरांच्या मानवी मनोऱ्यांमधील वरच्या किमान तीन थरांची तरी काळजी मिटते. पण, बालगोविंदांवरील बंदीमुळे दहीहंडी फोडण्यासाठी हे आठ ते नऊ थर रचणे गोविंदा पथकांना भविष्यात शक्य होणार नाही. त्यामुळे, दहीहंडीतील थरार कमी होईलच; शिवाय दहीहंडीच्या निमित्ताने स्थिरावू पाहणारे व्यावसायिक गणितही कोसळणार आहे. म्हणूनच आयोगाचा निर्णय केवळ एकतर्फीच नसून उच्च न्यायालयाने आधी दिलेल्या एका निकालाविरोधात असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत गोविंदा पथकांनी या बंदीला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. लहान मुलांच्या वापराबाबत गोविंदा मंडळांवर सक्ती करण्याऐवजी त्यांना थरांच्या स्पर्धेत ढकलणाऱ्या राजकीय नेत्यांनाच याबाबत समज का नाही देत, अशी विचारणा पथकांमधील कार्यकर्त्यांकडून होते आहे.
हा निर्णय घेण्यापूर्वी दहीहंडी मंडळांना त्यांची बाजू मांडण्याची संधी का देण्यात आली नाही, असा सवाल माझगावच्या ‘श्रीदत्त क्रीडा मंडळा’चे बाळा पडेलकर यांनी केला. लहान मुलांमधील दहीहंडीची आवड असल्यास योग्य प्रशिक्षण व सुरक्षेचे उपाय योजून दहीहंडीचे थर लावण्यास मनाई करू नये,’ अशा शब्दांत त्यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला.
दहीहंडी हा खेळ आहे. इतर खेळांमध्ये लहान वयापासून आवड जोपासून प्रशिक्षण दिले जाते. मग दहीहंडीचा अपवाद करू नये. पैशांसाठी थर लावणाऱ्या व्यावसायिक मंडळांवर ही बंदी आणावी. मात्र आमच्यासारख्या सांस्कृतिक सण म्हणून दहीहंडीचा प्रसार करणाऱ्या महिला दहीहंडी पथकांना हा नियम नको, अशी भूमिका ‘गोरखनाथ महिला दहीहंडी पथका’चे भाऊ कोरगावकर यांनी घेतली.
जोगेश्वरीच्या ‘जय जवान’ गोविंदा पथकाचे महेश सावंत यांनी लहान मुलांच्या सुरक्षेची काळजी आम्ही घेतच असतो, अशी प्रतिक्रिया मांडली. लहान मुले वजनाने हलकी असतात. त्यामुळे, त्यांचा वरचे थर लावण्यासाठी वापर केला जातो. मात्र, आता जर त्यांना सहभागी करता आले नाही तर हे थर रचणे कठीण होईल, अशी अडचण
त्यांनी मांडली.