28 February 2021

News Flash

माजी न्यायाधीश कोळसे पाटील यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

बीजी कोळसे पाटील यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मला अडकवू पाहात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

संग्रहित छायाचित्र

अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. यावरून राळ उठलेली असतानाच असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. पत्रकार संध्या मेननने आणखी काही प्रकरणांना वाचा फोडली आहे. महिला पत्रकारांना आलेले अनुभव तिने ट्विट केले आहेत. हे अनुभव   लेखक किरण नगरकर, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी.कोळसे पाटील आणि सुप्रसिद्ध फोटोग्राफर पाब्लो बार्थलोम्यू या तिघांच्या बाबतीतले आहेत. या तिघांनी लैंगिक गैरवर्तन कशाप्रकारे केले हे सांगणारे ट्विट्स संध्या मेननने ट्विट केले आहेत.

महिला पत्रकारांना कसे अनुभव येतात याबाबत तिने ट्विटरवर सविस्तर लिहिले आहे. त्या ट्विटस् ची एक मालिकाच तिने पोस्ट केली आहे. ज्यावर उलटसुलट प्रतिक्रिया तिला मिळत आहेत.

बी. जी कोळसे पाटील यांच्याबाबत महिला पत्रकाराला काय अनुभव आला?

बी. जी कोळसे पाटील यांची मुलाखत घेण्यासाठी मी गेले तेव्हा बाहेर खूप गर्दी होती. त्यामुळे आम्ही त्यांच्या घरात गेलो. मुलाखत संपली तेव्हा खुर्ची उचलत असताना ती त्यांना लागली. मी त्याबद्दल त्यांना सॉरीही म्हटले आणि वळले तेवढ्यात त्यांनी माझ्या शर्टची कॉलर खेचली आणि म्हटले की तू तुझ्या कुर्त्याचं वरचं बटण उघडं का ठेवलं आहेस? त्यानंतर मला ते सॉरी म्हटले पण जे काही घडले ते मी विसरू शकलेले नाही. निवृत्त न्यायमूर्ती माझ्याशी असे वर्तन करेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. आपण मित्र आहोत असे मला वाटले म्हणून मी असे केल्याचे त्यांनी मला सांगितले. मात्र इथे जे काही घडले ते बाहेर कोणालाही सांगू नकोस अशा विनवण्या त्यांनी मला वारंवार केल्या आणि माझी ते माफीही मागत राहिले. जर इथे जे काही घडले ते तू बाहेर सांगितलेस तर मी संपून जाईन असेही त्यांनी मला सांगितले. मी त्यांचे घर सोडले आणि निघाल्यानंतर काही क्षणात त्यांचा मला फोन आला आणि माझ्या विरोधात कोणाही कडे काही बोलू नकोस असे मला त्यांनी जवळजवळ धमकावलेच.

किरण नगरकर यांच्याबाबत दोन महिला पत्रकारांना आलेला अनुभव
पहिली पत्रकार म्हणते,  मी लेखक किरण यांची मुलाखत घेण्यासाठी काही वर्षांपूर्वी गेले होते. एका हॉटेलमधील रुममध्ये आम्ही भेटलो. माझ्यासोबत फोटोग्राफरही असणार होता मात्र त्याने ऐनवेळी येणे रद्द केल्याने मी एकटीच गेले होते. सुरूवातीला किरण नगरकर माझ्यासमोर बसले होते त्यानंतर ते माझ्या जवळ येऊन बसले. त्यांनी जास्तच जवळ येण्याचा प्रयत्न केला तेव्हा हळू हळू मी मागे सरकून बसले. मी माझी मुलाखत कशीबशी संपवली. निघताना त्यांनी मला त्यांचा नंबर दिला आणि इमेल आयडीही दिला. मला स्काइपवर अॅड कर आपण बोलू असे नगरकर यांनी आपल्याला सांगितले. त्यांनी मला त्यांचा कॉम्प्युटर दाखवला आणि मी अनेक महिलांशी रात्रीच संवाद साधतो तू तसेच कर असेही सांगितले. मी त्यांचा निरोप घेतला जायला निघाले तेव्हा ते म्हटले की इतका चांगला इंटरव्ह्यू दिला आहे मी आता मी तुला किमान एकदा मिठी मारू शकतो. मी त्यांना तसे करण्यास नकार दिला. मला असे करणे पटत नाही मी असे करत नाही असे उत्तर मी त्यांना दिले. तरीही त्यांनी मला मिठी मारली. गरजेपेक्षा जास्तच वेळ त्यांनी मला मिठी मारली, मी अवघडलेल्या अवस्थेत होते. तेव्हा मला अचानक लक्षात आले की ते माझ्या ब्राकडे पाहात आहेत. मला त्यांची किळस आली मी त्यांना ढकलले आणि तिथून निघाले. इथे जे काही घडले ते लाजीरवाणे आहे असे मी त्यांना सांगितले. त्यादिवशी जो अनुभव मला आला तो मी कधीही विसरु शकत नाही.

दुसऱ्या एका पत्रकाराने सांगितलेला अनुभवही असाच आहे. ज्यामध्ये ती म्हणते की, मी किरण नगरकरांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. माझ्यासोबत माझा फोटोग्राफरही होता. मी त्यावेळी फारसा विचार केला नाही पण त्यांच्या घरचे वातावरण फारसे चांगले वाटले नाही. मी त्यांची मुलाखत घेण्यास सुरुवात केली तेव्हा नगरकर माझ्या शेजारी येऊन बसले. बोलता बोलता त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि निघताना मला इच्छा नसताना मिठीही मारली. तसेच माझ्या संपर्कात राहा असेही त्यांनी सांगतिले. तो अनुभव माझ्यासाठी अत्यंत किळसवाणा होता.

 

दरम्यान बीजी कोळसे पाटील यांनी त्यांच्यावरचे सगळे आरोप फेटाळले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मला या प्रकरणात अडकवू पाहात असल्याचं उत्तर त्यांनी दिलं आहे. तर किरण नगरकर यांनी या सगळ्याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 4:18 pm

Web Title: kiran nagarkar kolse patil and bartholomew accused of sexual harassment
Next Stories
1 अर्नाळा पोलीस ठाणे परिसरात आढळलेली ती वस्तू टाइम बॉम्ब नाही!
2 शरद पवार जनतेमधून निवडणूक नाही लढणार
3 पार्थ पवारांच्या उमेदवारीला शरद पवारांकडून ब्रेक? अजित पवारांचे मौन
Just Now!
X