किरण पुरंदरे यांचे प्रतिपादन : ‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’मध्ये पक्ष्यांच्या रंजक विश्वाची सफर

मुंबई : ‘पक्ष्यांचा अधिवास हे संपन्न निसर्गाचे द्योतक आहे. त्यामुळे पक्षी संवर्धन महत्त्वाचे आहे. मात्र, फक्त झाडे लावणे म्हणजे निसर्ग संवर्धन नाही. गवत, झुडपे, पाणथळ जागा, माळरान असे सर्व नैसर्गिक घटक जपणे पक्षी संवर्धनासाठी गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

किलबिलाट, चिवचिवाटाच्या पलिकडील पक्ष्यांची भाषा, त्यांच्या परस्पर संवादातील स्वर-नादमाधुर्याची गंमत आणि त्याच्या जोडीला पक्षी संवर्धनाचा मंत्र यांसह ‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’ या वेबसंवादाच्या माध्यमातून पक्षी सप्ताहाची सांगता झाली. पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांनी पक्ष्यांची, त्यांच्या विश्वाची नव्याने ओळख करून दिली.

‘जगातील १२ टक्के पक्षी भारतात आहेत. भौगोलिक वैविध्य आणि वैशिष्टय़ामुळे भारतात पक्ष्यांचा अधिवास मोठय़ा प्रमाणावर आहे. जगातील १० हजार प्रजातींपैकी १३०० प्रजाती भारतात आढळतात. पक्ष्यांचे गाणे, आवाज हा त्यांचा संवाद असतो. पक्ष्यांची निसर्गातील भूमिका महत्त्वाची आहे. झाडांचे संवर्धन, जंगलांची वाढ, स्वच्छता, परागीभवन अशा अनेक भूमिका बजावून निसर्गाचा समतोल राखण्याचे काम पक्षी करतात, असे पुरंदरे यांनी सांगितले.

जंगलातील पक्ष्यांना सांभाळण्यासाठी जंगल सांभाळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शहरी पक्ष्यांचाही अधिवास जपण्याची आवश्यकता आहे. पक्ष्यांची ठरवून, हौशीसाठी होणारी शिकार रोखायला हवी. पक्ष्यांबद्दल असलेले गैरसमज, अपुरी माहिती त्यांच्यासाठी धोकादायक ठरते. पक्ष्यांची विष्ठा हे चांगले खत आहे. विष्ठेच्या माध्यमातून सेंद्रीय खत निर्मितीसाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे,’ असे पुरंदरे म्हणाले.

सापोत्री, लावा, हरियल, पावशा, मोर, कोतवाल, शीळकरी कस्तूर, नीलपंखी, खाटीक अशा अनेक पक्ष्यांचे आवाज काढून दाखवत पक्ष्यांच्या संवाद शैलीची पुरंदरे यांनी ओळख करून दिली. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी प्रास्ताविक केले तर ‘लोकसत्ता’च्या स्वाती पंडित यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

जंगलातील पक्ष्यांना सांभाळण्यासाठी जंगल सांभाळणे आवश्यक आहे. पक्ष्यांना निसर्गातील त्यांची भूमिका बजावू देणे हेच निसर्ग संवर्धन आहे. 

      – किरण पुरंदरे, ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ