सोमय्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांनी रविवारी मुलुंड पूर्व येथील संभाजी मैदानाजवळ व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्याच्या हातातील पैसे हिसकावून, फाडून त्याच्या तोंडावर फेकले. पुढे या फेरीवाल्याच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी सोमय्या यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला, तर फेरीवाल्याला दंड आकारला. या घटनेआधी सोमय्या यांनी मैदानाजवळ जनसंपर्क अभियानाअंतर्गत स्थानिक रहिवाशांची भेट घेतली. या भेटीत स्थानिक रहिवाशांनी संभाजी मैदानाच्या नूतनीकरणासह विविध विषयांवर सोमय्यांना लक्ष्य केले होते.

‘परिमंडळ – सात’चे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांनी सोमय्या यांच्याविरोधात भारतीय दंड विधानातील कलम ४२७ आणि ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदवल्याची माहिती दिली. सोमय्या यांनी संभाजी मैदानाजवळ रविवारी सकाळी स्थानिक रहिवाशांची भेट घेतली. संभाजी मैदानात महापालिकेककडून सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाबद्दल रहिवाशांनी  नाराजी व्यक्त केली. या चर्चेच्या अखेरीस परिसरातील कचऱ्याचा विषयही पुढे आला. मैदानाजवळ व्यवसाय करणाऱ्या काही फेरीवाल्यांना सोमय्या यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली.

तक्रारदार सचिन खरात येथे भाजी, फळविक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या तक्रारीनुसार सोमय्या यांनी  शिवराळ भाषा वापरत इथे व्यवसाय करण्यास कोणी परवानगी दिली, असा प्रश्न केला. त्यांनी भाजी, फळे रस्त्यावर उधळण्यास सुरुवात केली. व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत असताना काही महिला घेतलेल्या भाजी, फळांचे पैसे देत होत्या. इतक्यात सोमय्या यांनी खरात याच्या हाती ग्राहक महिलेने दिलेले पैसे हिसकावले. ते सर्वासमक्ष टराटरा फाडले आणि खरातच्या तोंडावर फेकले.

खरात तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला. पाठोपाठ भाजप वगळून सर्वपक्षीय स्थानिक राजकीय मंडळींनी पोलीस ठाणे गाठले.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजीत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार खरातवर तक्रार करू नये यासाठी पोलीस ठाण्यात दडपण आणले जात होते.  तसेच जबाबामधून पैसे हिसकावले, फाडले हा उल्लेख वगळण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार शिशिद शिंदे यांनी या प्रकरणी पोलिसांनी सोमय्यांविरोधात गुन्हा नोंदवणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया  दिली. याबाबत पोलीस उपायुक्त सिंग यांच्याकडे विचारणा केली असता तक्रारदाराची तक्रार आणि जबाबानुसार योग्य ती कारवाई केली आहे. पुढील चौकशी सुरू आहे. ज्यांना या कारवाईबद्दल आक्षेप असेल किंवा ती अपुरी वाटत असेल त्यांनी जरूर न्यायालयात तक्रार करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सोमय्या यांच्याशी  संपर्क साधला. मात्र त्यांनी फोन घेतला नाही. धाडलेल्या लघुसंदेशालाही त्यांनी उत्तर दिले नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya fight with hawkers
First published on: 21-05-2018 at 01:27 IST