जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्याविरुध्दच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी योग्य तपास न करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याकडे केली आहे.
तटकरे यांच्या कथित गैरव्यवहाराची, कंपन्या व मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सोमय्या, माधव भांडारी आदींनी उच्च न्यायालयात सादर केली आहे. न्यायालयाने पोलीस व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासाबाबत नापसंती व्यक्त करून काही दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे हेतुपुरस्सर तपास न करणारे आणि गैरव्यवहारांची दखल न घेणारे आर्थिक गुन्हे विभागाचे अतिरिक्त आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंलाच, अतिरिक्त महासंचालक, रायगडचे जिल्हाधिकारी यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. त्यांनी गृहमंत्र्यांची यासंदर्भात भेट घेऊन निवेदन दिले.