किरीट सोमय्या (भाजप), ईशान्य मुंबई
खासदार नसतानाही ज्या तडफेने किरीट सोमय्या यांनी मुंबईतील प्रश्नांचा, तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या घोटाळ्याचा भंडाफोड केला, त्या सर्वच प्रश्नांचा आता त्यांना विसर पडला की काय, अशी शंका आता येऊ ksलागली आहे. कारण मुलुंड, कांजूरमार्ग येथील घनकचऱ्याचा प्रश्न, खासगी वनांचा प्रश्न, झोपडपट्टीवासीयांच्या समस्यांमध्ये काहीही फरक पडलेला नाही. न्यायालयाच्या आदेशामुळे कचऱ्याच्या समस्येतून काहीसा दिलासा मिळाला असला तरी खासदार आपला प्रभाव पाडू शकलेले नाहीत. दळणवळणाच्या सुविधांचे जाळे निर्माण करणे, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर तसेच उपनगरीय रेल्वे प्रवाशांचे प्रश्न निवडणुकीत सोमय्या यांनी मांडले होते. त्यातील रेल्वेशी संबंधित प्रश्नांची काही प्रमाणात सोडवणूकही त्यांनी केली आहे. सोमय्यांच्या पाठपुराव्यामुळे मध्य रेल्वेच्या बहुतांश सर्वच स्थानकांवरील फलाटांची उंची वाढविण्याचे काम सुरू झाले आहे. मुलुंड भागातील ५० हजार कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचा उपक्रमही सोमय्या यांनी हाती घेतला आहे.

आश्वासनांचा विसर – मेधा पाटकर (पूर्वी आम आदमी पक्ष)
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांचा किरीट सोमय्यांना पुरता विसर पडलेला असावा. त्यांच्या पक्षाने गेले वर्षभर गरिबांच्या विरोधात काम केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच मेहरबानीवर खासदार झालेल्या सोमय्या यांच्याकडूनही ते गरिबांसाठी काही तरी करतील, अशी अपेक्षा करणेच गैर आहे. ईशान्य मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या समस्या असोत, झोपडपट्टीवासीयांच्या मूलभूत समस्या असोत, घनकचऱ्याचा  प्रश्न असो वा वन जमिनीचा प्रश्न असो गेल्या वर्षभरात खासदारांनी यातील एकाही प्रश्नाची सोडवणूक तर केली नाहीच तर त्यातील अनेक प्रश्नांना साधा स्पर्शही केलेला नाही.

चेहरामोहरा बदलणार
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना पूर्वीच्या खासदारांनी पाच वर्षांत जेवढी कामे केली नाहीत तेवढी कामे आपण एका वर्षांत मार्गी लावली. मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांमधील १३१ प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, ३२ स्थानकांमध्ये सरकते जिने बसविणे, खासगी वनांच्या संकटातून मुलुंड, भांडुप परिसरातील रहिवाशांची सुटका केली. १०० शाळांमध्ये एलईडी दिव्यांची सोय करून देण्यात आली असून घराघरांमध्ये शौचालयांची योजना राज्यात सर्वात प्रथम याच मतदारसंघात राबविण्यात येणार असून तीन वर्षांत या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदललेला असेल.
किरीट सोमय्या</p>

-संजय बापट