धनंजय मुंडे यांच्या दोन पत्नी वाद प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आपल्या प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख केलेला नाही, असा दावा करत याप्रकरणाची मुंडे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

सोमय्या यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं, मी या पत्रासोबत महाराष्ट्रातील मंत्री धनंजय मुंडे यांच्यासंबंधीची काही कागदपत्रे जोडली आहेत. त्यानुसार, मुंडे यांनी आपण दोनदा लग्न केल्याचं जाहीर केलं असून दोन्ही पत्नींची आणि मुलांची काळजी घेत असल्याचंही जाहिररित्या म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीची बहिण रेणू शर्मा यांनी काल मुंबई पोलिसांमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार आणि लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, मुंडे यांनी या तक्रारीनंतर आपली बाजू मांडताना फेसबुकवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आपण दोन्ही पत्नींच्या नावे मालमत्ता खरेदी केली आहे. तसेच त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलांना त्यांनी आपलं नाव दिलं असून ते त्यांचं पालनपोषणही करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी रेणू शर्मा आणि आपल्यात जवळचे संबंध असल्याचंही मान्य केलं आहे, असं सोमय्या यांनी पत्रात म्हटलं आहे.

मात्र, धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना ऑक्टोबर २०१९मध्ये आपल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या दोन पत्नींची तसेच सर्व मुलांची माहिती आणि त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहिती लपवली होती, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी, असं सोमय्या यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.