मुंबईत १३ ते १५ जूनदरम्यान संमेलन

मुंबई :  ९८व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची बहुचर्चित निवडणूक पार पडल्यानंतर गुरुवारी झालेल्या नाटय़ परिषद कार्यकारिणी आणि नियामक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीतच या वर्षीचे संमेलन १३ ते १५ जून दरम्यान मुंबईत होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कीर्ती शिलेदार, श्रीनिवास भणगे आणि सुरेश साखवळकर यांच्यात चुरस होती, मात्र गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत कीर्ती शिलेदार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याआधी १९९३ साली मुंबईत नाटय़ संमेलन झाले होते. आता बरोबर पंचवीस वर्षांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाचे बिगूल वाजणार आहे.

नाटय़ परिषद निवडणूक पार पडल्यानंतर ९८व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या आयोजनाचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येईल, असे नाटय़ परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार या पहिल्या बैठकीत अध्यक्ष निवडीबरोबरच नाटय़ संमेलनाच्या तारखा आणि स्थळही जाहीर करण्यात आले.

यंदाच्या नाटय़ संमेलनासाठी परिषदेच्या महाबळेश्वर शाखेकडून प्रस्ताव आला होता आणि जून महिन्यात संमेलन घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र जून महिन्यात पाऊस असल्याने ऑक्टोबरमध्ये संमेलन घेण्याची विनंती महाबळेश्वर शाखेने केली होती, परंतु ऑक्टोबर महिन्यात खूप उशीर होईल असे कारण देत हा प्रस्ताव नाकारण्यात आल्याचे नाटय़ परिषदेच्या सूत्रांनी सांगितले.

नाटय़ परिषदेचे अध्यक्ष म्हणून प्रसाद कांबळी यांचे हे पहिलेच नाटय़ संमेलन असणार आहे. मुंबईत नाटय़ संमेलन कुठे घ्यायचे याच्या निवडीचे सर्वाधिकार नियामक मंडळाने प्रसाद कांबळी यांच्याकडे दिले आहेत. सगळे नाटय़कलाकारही मुंबईत असल्याने ते संमेलनासाठी सहज उपलब्ध होतील आणि खर्चही वाचेल. नियोजनासाठी सोपे ठरेल, हा विचारही मुंबईत नाटय़ संमेलन घेण्यामागे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.