सोमवारची सकाळ मुंबईकरांसाठी एक वेगळी आणि असंख्य प्रश्न मनात जागवणारी सकाळ ठरली आहे. हजारोंच्या संख्येने मुंबईत दाखल झालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे मुंबईकराच्या आयुष्यावर बळीराजाच्या या मोर्चाचे प्रभाव पाहायला मिळत आहेत. या अन्नदात्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी म्हणून प्रत्येकजण आपआपल्या परिने प्रयत्न करत आहे. तर आझाद मैदानातही मोर्चेकऱ्यांसाठी अन्न, पाणी यासोबतच वैद्यकिय सुविधाही पुरवण्यात येत आहेत.

दरम्यान, नाशिकहून सुरु झालेला हा मोर्चा रविवारी मुंबईत धडकला खरा. पण, उन्हाता वाढता दाह आणि अनवाणी पायांमुळे शेतकऱ्यांच्या वेदना कुठेतरी वाढत असल्याचं पाहायल मिळालं. आझाद मैदानात दाखल झालेल्या या मोर्चातील शेतकऱ्यांच्या पायांना भेगा पडल्या असून, त्यामुळे त्यांना त्रास होत असल्याचं स्पष्ट झालं. तर सूर्याचा पारा चढत असल्यामुळे या परिस्थितीत सतत चालत राहिल्यामुळे आणि शरीराला जराही विश्रांती न मिळाल्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असून, त्यांना अतिसाराची लागण झाल्याची माहिती तेथे उपस्थित डॉक्टरांनी दिली आहे.

पाहा : PHOTOS : अन्नदात्यांचा शीख- मुस्लीम बांधवांनी असा केला पाहुणचार

सध्याच्या घडीला आझाद मैदानामध्ये शेतकऱ्यांची गर्दी पाहाचला मिळत असून, तेथील संपूर्ण परिसरावर लाल रंगाचंच वर्चस्व पाहायला मिळत आहे. आपल्या विविध प्रश्नांचं गाठोडं घेऊन, मुंबापुरीत आलेल्या बळीराजाच्या मागण्या आता सरकार दरबारी मान्य होणार का, याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव, कृषिपंप वीजबिल माफी, स्वामीनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावित, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.