लाल बावट्याचा पराभव कोणी करू शकत नाही, असे ठणकावून सांगताानाच त्रिपुरात लाल बावटा पडला पण नाशिकमध्ये उभा राहिला, असे माजी आमदार नरसय्या आडम यांनी म्हटले आहे. तर त्रिपुरात अमित शाह मोदींनी पैसा वापरला, असा आरोप कामगार सीटू संघटनेचे राज्याध्यक्ष डी. एल. कराड यांनी केला.
कर्जमुक्ती द्यावी, शेतमालाला दीडपट हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या पुढाकारातून हा मोर्चा काढण्यात आला आहे. आझाद मैदानात दुपारी किसान सभेच्या नेत्यांनी संबोधित केले. सरकारला आपलं म्हणणं मान्य करायला भाग पाडायचं असून मागण्या मान्य केल्या नाही तर उद्यापासून इथेच उपोषणाला बसणार, असा इशाराच आमदार जे.पी गावित यांनी दिला. कोणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी सरकारची असेल. सरकारला त्यांच्या भाषेत ठणकावून सांगू, असेही त्यांनी म्हटले आहे.
कॉम्रेड नरसय्या आडम, डी एल कराड आदी नेत्यांनीही शेतकऱ्यांना संबोधित केले. जर सरकारने चालबाजी केली तर लढाईची तयारी ठेवा. छातीवर गोळ्या झाडल्या तरी या सरकारला सोडणार नाही, असा इशारा या नेत्यांनी दिला.
शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न असून हे आंदोलन सरकारला ताळ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असे आडम यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आंधळ्या भैरया सरकारकडे मांडण्यासाठी चालत आलात यासाठी मी तुमचा आभारी आहे, असे त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून सांगितले. आमच्या कष्टाचे पैसे मिळाले पाहिजेत. आश्वासन अजूनही पूर्ण होत नसून हे विश्वासघातकी, गद्दार आणि लबाड सरकार आहे. हे सरकार २०१९ मध्ये आपल्याला पाडायचं आहे. नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं पण पोर नुसती फिरत आहेत, अशी टीका कराड यांनी केली.
हे सरकार फक्त श्रीमंतासाठी काम करत असून वस्तू आणि सेवाकर आणून व्यापाऱ्यांची वाट लावली. आपलं सरकार येत नाही तोपर्यंत अश्रू कोणी पुसणार नाही. शेतकरी आणि कामगारांची एकजूट झाली पाहिजे, असे आवाहन या सभेत करण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 12, 2018 11:47 am