विषाणूने जगावर काही दिवसांसाठी लादलेल्या सक्तीच्या बंदीत घरातील बालक आणि पालक सध्या अव्याहत येणाऱ्या कंटाळ्याशी वेगवेगळ्या प्रकाराने झुंजत आहेत. राज्यातील वाचनप्रेमी मंडळींनी मात्र हाती आलेल्या वेळेत ‘किशोर’ या बाल-युवक मासिकाचे मोफत उपलब्ध अंक डाऊनलोड करून वाचण्याचा धडाका लावला आहे.

मोबाइलधार्जिणी पिढी म्हणून चिंता करणारा पालकवर्ग सध्या आपल्या बालपणातील वाचन सवंगडी ‘किशोर’चा खजिना मुलांना उपलब्ध करून देत आहेत. राज्यात संचारबंदी लागू झाल्यापासून (२१ मार्च) शुक्रवार (२७ मार्च) या सात दिवसांत दीड लाख वाचकांनी ऑनलाइन अंक डाऊनलोड केले आहेत. बालभारती  जवळपास पन्नास वर्षे किशोर हे मुलांसाठीचे मासिक प्रकाशित करते. त्याच्या सर्व अंकाचे बुकगंगा डॉट कॉम या संकेतस्थळाच्या सहकार्याने ऑनलाइन दस्तावेजीकरण करून दोन वर्षांपूर्वी ते सर्वासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले. सध्या संचारबंदीच्या काळात या अंकावर वाचकांच्या उडय़ा पडत आहेत. हे चित्र मुलांमधील वाचनवाढीसाठी सुखावह आहे.

फक्त सात दिवसांत..

किशोरचे ऑनलाइन अंक जानेवारी २०१८ पासून उपलब्ध झाले. १९७१ पासूनचे सारे अंक बालभारतीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून वाचता येतात. जानेवारी २०१८ ते २० मार्च २०२० पर्यंत हे अंक चाळणाऱ्यांची संख्या साधारण ५ लाख १० हजार होती. विषाणूवर मात करण्यासाठी २१ मार्चला नागरिकांनी घरातच राहण्याचे आदेश शासनाने दिले. तेव्हापासून २७ मार्च सायंकाळी पाच वाजेपर्यंत किशोरचे अंक डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या जवळपास दीड लाखांनी वाढून ६ लाख ५६ हजार ९५० झाली होती.

संग्रहमूल्य टिकून..

पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, दुर्गा भागवत, शांता शेळके, नरहर कुरुंदकर, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, यांसारख्या अनेक दिग्गजांच्या साहित्यकृतींनी किशोरचे संग्रहमूल्य आजही टिकून राहिले आहे. अलीकडच्या काळात गरजेनुसार मराठीबरोबरच इंग्रजीतील गोष्टी, कविता, कोडी यांचाही समावेश अंकात करण्यात आला आहे.

काळानुसार अंक बदलत गेला तरी जुने अंकही कालातीत असल्याचे दिसते आहे. मुलांबरोबर मोठेही जुने अंक काढून अनेकदा वाचतात. सध्या मुले पूर्णवेळ घरात असल्याने त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी, त्यांच्या डोक्याला खाद्य देण्यासाठी या अंकांचा नक्कीच उपयोग होत आहे.

– किरण केंद्रे, कार्यकारी संपादक