07 March 2021

News Flash

सहेला रे.. आ मिल जाए!

गेले काही दिवस किशोरीताईंच्या प्रकृतीच्या किरकोळ कुरबुरी सुरू होत्या. मात्र सोमवारी अत्यंत किरकोळ आजाराचे निमित्त झाले आणि या जगविख्यात गायिकेने राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे देहावसान; शुद्ध सूर शाश्वत सुरांना मिळाला..

किशोरी आमोणकर १९३२-२०१७

‘सहेला रे आ मिल जाए..’ अशा शब्दांत जणू शुद्ध सुरांचीच आयुष्यभर आळवणी करणाऱ्या, त्याच्याशी एकरूप होण्याची आस बाळगणाऱ्या, त्याच्याशी अविचल-अढळ निष्ठा राखणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचे सोमवारी रात्री मुंबईत देहावसान झाले. श्वासनिश्वासात ज्यांच्या फक्त संगीत आणि संगीतच भरून उरले होते अशा या ज्येष्ठ व श्रेष्ठ गायिकेच्या आयुष्याचे गाणे सोमवारी कुणाच्या ध्यानीमनी नसताना संपले आणि शोकमग्न झालेल्या संगीतविश्वात एकच प्रतिक्रिया उमटली.. शुद्ध सूर शाश्वत सुरांना मिळाला..

गेले काही दिवस किशोरीताईंच्या प्रकृतीच्या किरकोळ कुरबुरी सुरू होत्या. मात्र सोमवारी अत्यंत किरकोळ आजाराचे निमित्त झाले आणि या जगविख्यात गायिकेने राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

किशोरीताईंचा जन्म १० एप्रिल १९३२ रोजीचा.. मुंबईतला. अगदी लहान वयापासूनच त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. जयपूर अत्रौली घराण्याच्या तालेवार गायिका मोगुबाई कुर्डीकर या किशोरीताईंच्या मातोश्री. त्यामुळे गाणे वारसाहक्काने त्यांच्याकडे आले होतेच. मात्र केवळ वारसाहक्कावर समाधान न मानता विलक्षण गुणग्राहक वृत्तीने किशोराताईंनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जे जे मोलाचे ते ते वेचले आणि आपले गाणे समृद्ध केले. शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग, अत्यंत कमी प्रमाणात गायलेली भावगीते, चित्रपटगीते हे त्यांनी मागे ठेवलेले संचित. आवाजावरील हुकूमत, स्वरांमध्ये पूर्ण बुडून जाण्याची क्षमता, सर्जकता, अभ्यास अशा अनेक गुणवैशिष्टय़ांमुळे किशोरीताईंचे गाणे कधी खुंटले नाही. ते दिवसागणिक वाढत, विस्तारत, विकास पावत गेले. त्या गाण्याने रसिकांना भरभरून आनंद व सांगीतिक समृद्धी दिली. विविध रागांतील त्यांच्या रचना गाजल्याच, मात्र ‘सहेला रे.. आ मिल जाये..’ ही भूप रागातील त्यांची रचना म्हणजे जणू सुरांचा कळसाध्यायच.

शास्त्रीय संगीतात किशोरीताईंनी अनेक प्रयोग केलेच, सोबत त्यांच्या भावगीत आणि भजनांनीही रसिकांना स्वरसंस्कारित केले.

  • अवघा रंग एक झाला, मी माझे मोहित, जनी जाय पाणियासी हे त्यांचे अभंग, तसेच म्हारो प्रणाम ही मीरेची भजने लोकप्रिय होती. जाईन विचारीत रानफुला, हे श्यामसुंदरा.. ही हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली गाणीही गाजली, ‘गीत गया पत्थरोने’ (१९६४) या हिंदी चित्रपटात त्यांनी प्रथम पाश्र्वगायन केले. दृष्टी (१९९०) हा त्यांनी संगीत दिलेला पहिला हिंदी चित्रपट होता.
  • सरकारने पद्मभूषण (१९८७) आणि पद्मविभूषण (२००२) या पुरस्कारांनी त्यांना गौरविले होते. ‘स्वरार्थ रमणी राग सिद्धांत’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 12:13 am

Web Title: kishori amonkar passed away
Next Stories
1 मुंबई-पुण्यात घर खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी गुड न्यूज
2 नगरसेवकांच्या मोबाइल बिलासाठी उधळपट्टी
3 वास्तुविशारदांना बांधकाममंजुरी अधिकार!
Just Now!
X