25 February 2021

News Flash

नरेंद्र मोदी आणि राजकीय नेत्यांनी वाहिली किशोरी आमोणकर यांना श्रद्धांजली

शोकमग्न झालेल्या संगीतविश्वात एकच प्रतिक्रिया उमटली.. शुद्ध सूर शाश्वत सुरांना मिळाला..

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सोमवारी रात्री मुंबईत निधन झाले

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सोमवारी रात्री मुंबईत निधन झाले. गेले काही दिवस किशोरीताईंच्या प्रकृतीच्या किरकोळ कुरबुरी सुरू होत्या. मात्र सोमवारी अत्यंत किरकोळ आजाराचे निमित्त झाले आणि या जगविख्यात गायिकेने राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. किशोर आमोणकर यांच्या निधनाने शोकमग्न झालेल्या संगीतविश्वात एकच प्रतिक्रिया उमटली.. शुद्ध सूर शाश्वत सुरांना मिळाला..

दरम्यान, विविध क्षेत्रातील मंडळींनी किशोरी आमोणकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे कधीही न भरून येणारे नुकसान झाल्याचे म्हणत किशोरीताईंना श्रद्धांजली वाहिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, शिवराजसिंग चौहान, ममता बॅनर्जी, सुरेश प्रभू यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘किशोरीताईंच्या निधनाने हिंदुस्थानी संगीताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे गाणे अजरामर राहील,’ असे प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी म्हटले आहे.

सरकारने पद्मभूषण (१९८७) आणि पद्मविभूषण (२००२) या पुरस्कारांनी किशोरीताईंना गौरविले होते. ‘स्वरार्थ रमणी राग सिद्धांत’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. शास्त्रीय संगीतात किशोरीताईंनी अनेक प्रयोग केलेच, सोबत त्यांच्या भावगीत आणि भजनांनीही रसिकांना स्वरसंस्कारित केले. ‘अवघा रंग एक झाला’, ‘मी माझे मोहित’, ‘जनी जाय पाणियासी’ हे त्यांचे अभंग, तसेच ‘म्हारो प्रणाम’ ही मीरेची भजने लोकप्रिय होती. ‘जाईन विचारीत रानफुला’, ‘हे श्यामसुंदरा.. ‘ही हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली गाणीही गाजली. ‘गीत गाया पत्थरोने’ (१९६४) या हिंदी चित्रपटात त्यांनी प्रथम पार्श्वगायन केले. दृष्टी (१९९०) हा त्यांनी संगीत दिलेला पहिला हिंदी चित्रपट होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 11:05 am

Web Title: kishori amonkars demise irreparable loss to indian classical music pm modi
Next Stories
1 मुंबईत २४ वर्षीय तरुणाची १९ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, ‘फेसबुक लाइव्ह’ केल्यानंतर दिला जीव
2 मुंबईत उपनगरी रेल्वेचा प्रवास, कानांना त्रास!
3 येत्या पावसाळ्यातही रस्ते खड्डय़ात?
Just Now!
X