मुंबईतील खड्डय़ांचे प्रश्न असो की विविध कारणांमुळे पक्षावर होणारी टीका असो, प्रत्येक वेळी तडफेने प्रत्युत्तर देणाऱ्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना पक्षनेतृत्वाशी एकनिष्ठ राहण्याचे बक्षीस सोमवारी महापौर पदाच्या उमेदवारीतून मिळाले. आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी वरळी पिंजून काढणाऱ्या किशोरी पेडणेकर यांच्यासह पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावाचीही महापौर पदासाठी चर्चा होती. मात्र, सोमवारी सायंकाळी अखेरच्या क्षणी पेडणेकर यांचे नाव जाहीर करून शिवसेनेने आपले धक्कातंत्र कायम ठेवले. उपमहापौरपदी अ‍ॅड. सुहास वाडकर यांना संधी देण्यात आली आहे.

गिरणी कामगारांच्या कुटुंबातून असलेल्या किशोरी पेडणेकर या कट्टर शिवसैनिक आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात त्या अग्रेसर असतात. परिचारिकेचे शिक्षण घेतलेल्या किशोरी यांची नगरसेविका पदाची ही तिसरी वेळ आहे. स्थायी समिती, महिला बाल कल्याण समिती, सुधार समिती या समित्यांवरील कामाचा त्यांना अनुभव आहे. विधानसभा निवणुकीच्या वेळी आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. निष्ठावान अशी ओळख असलेल्या किशोरी यांच्यावर मातोश्रीचाही विश्वास आहे. त्यामुळे महापौर पद महिला आरक्षित नसतानाही पुरुषांना डावलून किशोरी यांच्या नावाची घोषणा पक्षाने केली.

महापौर पद खुले (आरक्षण वर्ग) झाल्यानंतर शिवसेनेतर्फे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, अनुभवी नगरसेवक आशीष चेंबूरकर, मंगेश सातमकर, विशाखा राऊत अशी अनेक नावे चर्चेत होती. महापौर पदासाठी अर्ज भरण्याची मुदत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत होती. शिवसेनेत महापौर पदासाठी अनेक दावेदार असताना संध्याकाळी सव्वापाच वाजेपर्यंत नाव जाहीर झाले नव्हते. त्यामुळे पालिका मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयात आज दिवसभर पत्रकार आणि शिवसेना नगरसेवक ठाण मांडून बसले होते. अखेरच्या क्षणी आमदार अनिल परब मातोश्रीहून नव्या महापौरांच्या नावाचा लखोटा घेऊन पालिकेत दाखल झाले. त्यानंतर चिटणीस विभागात जाऊन किशोरी पेडणेकर आणि सुहास वाडकर यांनी आपले अर्ज दाखल केले.

विधानसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघातून यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी निवडून आल्या. ही जागा शिवसेनेकडे स्वत:च्या ताकदीवर खेचून आणल्यामुळे ‘मातोश्री’ यशवंत जाधव यांच्यावर खूश आहे. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर होते. शिवाय येत्या काळात भाजपची शिवसेनेला पालिकेत डोकेदुखी होऊ  शकते. अशा वेळी सक्षम महापौर असावा म्हणून जाधव यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. मात्र ते स्वत: या पदासाठी इच्छुक नव्हते. तसेच जाधव यांना महापौरपदी नेमल्यास स्थायी समितीवरही सक्षम उमेदवार द्यावा लागला असता. हा पेच सोडवण्यासाठी सोमवारी सकाळीच जाधव यांना मातोश्रीवर बोलावून घेण्यात आले होते. त्यामुळे सोमवारची स्थायी समितीची बैठकही नगरसेवक आमदार रमेश कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आटोपण्यात आली. अखेर जाधव यांनी नकार दिल्याने पेडणेकर यांचे महापौर पदासाठी नाव निश्चित करण्यात आले.

नाराजी कायम

महापौर पदासाठी शिवसेनेतील अनेक ज्येष्ठ नगरसेवक इच्छुक होते. त्यात आशीष चेंबूरकर आणि मंगेश सातमकर यांच्या नावांची चर्चा होती. या दोन्ही नगरसेवकांना काही महिन्यांपूर्वी स्थायी समितीचा राजीनामा द्यायला लावला होता. त्यामुळे त्यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र तसे न झाल्यामुळे ते नाराज असल्याचे समजते.