तीन महिन्यांच्या व्यत्ययानंतर पुस्तकालय पुन्हा सुरू; आगीमुळे ४५ हजार पुस्तकांचे नुकसान

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : पत्रकार, लेखक, कलावंत अशा समाजातील साहित्यप्रेमी धुरीणांपासून ते सामान्य वाचकांपर्यंत सर्वानाच पुस्तकांच्या सान्निध्यात निवांत क्षण देणारे ‘किताबखाना’ आता पूर्ववत करण्यात आले असून ते लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षअखेरीस लागलेल्या आगीत ‘किताबखाना’चा बराचसा भाग जळून खाक झाला होता. येथील साहित्यसंपदेचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ११ मार्चला ‘किताबखाना’ सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे.

गेल्या वर्षी ९ डिसेंबरला ‘किताबखाना’च्या उपाहारगृहात आग लागली होती. आग आणि ती विझवण्यासाठी मारण्यात आलेल्या पाण्यामुळे ९५ लाख रुपये किमतीची ४५ हजार पुस्तके  खराब झाली. फर्निचरचीही हानी झाली. त्या दिवशी ‘किताबखाना’चे एकू ण दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती किताबखानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टी. जगत यांनी दिली. आगीच्या घटनेनंतर नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने ‘किताबखाना’ बंद ठेवण्यात आले होते. मंगळवारी, २ मार्चला ‘किताबखाना’ला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पूजा करण्यात आली. वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विशेष पुस्तक प्रदर्शन भरवले जाते. या वर्षी मात्र ते होऊ शकले नाही. अनेक वाचक ‘किताबखाना’ सुरू करण्याबाबत विचारणा करत आहेत. काही तर मदतनिधी देण्यासही उत्सुक आहेत.

‘किताबखाना’ने ऑनलाइन सेवा पूर्वी कधीच दिली नव्हती. टाळेबंदीत मात्र फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून  ग्राहकांनी नोंदवलेली मागणी काही प्रमाणात पुरवण्यात आली. काही ऑनलाइन कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. यातून वाचकांशी असलेले नाते टिकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतक्या वर्षांत प्रथमच ‘किताबखाना’ची कपाटे रिकामी दिसत आहेत. पण लवकरच ती पुस्तकांनी भरतील आणि पुन्हा वाचकांची वर्दळ सुरू होईल, अशी आशा व्यवस्थापनाला आहे.

वाचनवेडय़ांसाठी हक्काची जागा

जगभर प्रवास करताना परदेशातील पुस्तकांची वैविध्यपूर्ण दुकाने पाहून अम्रिता सोमय्या आणि समीर सोमय्या भारावून जायचे. निवांतपणे एके का पुस्तकाचा आस्वाद घेत पुस्तकांच्या जगात हरवून जावे, अशी एखादी जागा मुंबईत नाही याची खंत सोमय्या दाम्पत्याला होती. यातूनच १२ वर्षांपूर्वी त्यांना ‘किताबखाना’ची संकल्पना सुचली आणि दोनच वर्षांत दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात वाचनवेडय़ांसाठी हक्काची जागा निर्माण झाली. लंडन येथील वार्षिक पुस्तक प्रदर्शनात जगभरातील इंग्रजी साहित्य उपलब्ध असते. त्यातून सर्वोत्कृष्ट पुस्तकांची निवड करून ती ‘किताबखाना’मध्ये आणली जातात. अनेक भारतीय प्रकाशकांचे ज्या पुस्तकांकडे दुर्लक्ष होते, अशी पुस्तके  जाणीवपूर्वक निवडली जातात. के वळ विरंगुळा म्हणून वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांपेक्षा वैचारिक भान देणाऱ्या पुस्तकांना ‘किताबखाना’मध्ये मानाचे स्थान मिळते. ‘किताबखाना’च्या बालसाहित्याचाही परीघ मोठा आहे. भारतीय भाषांचे प्रतिनिधित्व करणारी मराठी, हिंदी आणि गुजराती पुस्तके ही येथे मिळतात. पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या मराठमोळ्या लेखकापासून ते लिओ टॉलस्टॉय, दोस्तोवास्की यांसारख्या रशियन लेखकांपर्यंत अनेक दिग्गज साहित्यिक ‘किताबखाना’मध्ये पुस्तकरूपाने भेटतात.

‘किताबखाना’च्या कर्मचाऱ्यांना साहित्याची चांगली जाण आहे. त्याचा फायदा नवख्या वाचकांना पुस्तके  निवडण्यासाठी होतो. शिवाय जाणकार वाचकांशी होणाऱ्या चर्चेतून कर्मचाऱ्यांनाही बरेच काही शिकायला मिळते. टाळेबंदीनंतर बाजारात बरीच उलाढाल झालेली असताना, ग्राहकांची क्रयशक्ती कमी झालेली असतानाही ‘किताबखाना’ला भविष्यातील विक्रीबाबत चिंता नाही. यापुढे उपाहारगृहाची सुविधा असेल, मात्र तेथे पदार्थ तयार के ले जाणार नाहीत. आगीत हानी न पोहोचलेली काही पुस्तके  राखून ठेवण्यात आली आहेत. जुन्या ग्राहकांना भरघोस खरेदीसोबत एखादे पुस्तक भेट म्हणून दिले जाईल.

 – टी. जगत, मुख्य कार्यकारी अधिकारी, किताबखाना