मोकळ्या जागांची कमतरता, आभासी खेळांचा परिणाम

मनोरंजनाची बदललेली साधने, तरुणाईच्याही बदललेल्या आवडीनिवडी, शहरातील हरवलेली मोकळी मैदाने, भ्रमणध्वनी मनोरे आदी विविध कारणांमुळे यंदा पतंगांची दुकाने ग्राहकांशिवाय ओस पडली आहेत. त्यामुळे बाजारात यंदा पतंग आणि मांज्याच्या विक्रीत सुमारे ५० टक्क्यांनी घट झाली आहे.

आधी संगणक आणि त्यानंतर भ्रमणध्वनीच्या जाळ्यात अडकलेली तरुणाई मैदानी खेळापेक्षा आभासी खेळामध्येच जास्त रमायला लागली आहे. त्यामुळे जुन्या काळातील अनेक खेळ काळाच्या ओघात लोप पावत असून त्यात आता पतंगांचाही समावेश झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पतंग आणि मांज्याच्या व्यवसायाला उतरती कळा लागली असल्याची खंत कुर्ला, डोंगरी भागातील पतंग विक्रेत्यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली आहे.

डोंगरी भागातील मुकीन पतंगवाले यांच्या वडिलांनी सुमारे साठ वर्षांपूर्वी पतंगांचे दुकान सुरू केले. स्वत:चा पतंग बनविण्याचा कारखाना असलेले मुकीन गेल्या काही वर्षांपासून मात्र बरेली येथून तयार पतंग विकत घेऊन व्यवसाय करत आहेत. काही वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिना सुरू झाला की आकाशात पतंग भिरभिरायला लागायचे. जानेवारीमध्ये तर व्यवसायात एवढी गर्दी आणि धावपळ असायची की दुकानात दहा कारागीरही विक्री करण्यासाठी कमी पडायचे. आमचे दहा माणसांचे कुटुंब या व्यवसायावर आरामत जगत होतं. आता दुकानात अजिबात गर्दी नाही. काही ठरावीक पतंगप्रेमी सोडले तर तरुणाईने पतंगबाजीकडे पाठच फिरवली असून यंदा पतंग आणि मांज्याचा बाजार निम्म्यावर आल्याची माहिती मुकीन यांनी दिली.

कुर्ला येथील पतंगांचे सर्वात जुने व्यापारी मोहम्मद खान यांनी सांगितले, संक्रांत जवळ आली की आम्ही कांदिवली, मालाडपासून भाडय़ाने जागा घेऊन पतंगांची विक्री करण्यासाठी मंडप उभारत होतो. तेव्हा एका दिवसात पतंगांची खूप मोठय़ा प्रमाणात विक्री होत होती. आता पतंगप्रेमींची संख्या घटल्यामुळे एक किंवा दोन कोडी (२० पतंगांचा संच) पतंगांची विक्री होत आहे. ऑगस्ट महिन्यापासूनच आमचा पतंग तयार करण्याचा कारखाना सुरू व्हायचा. कारखान्यात त्यावेळी २० ते ३० कामगार काम करत होते. आता पतंगांची मागणी कमी झाल्यामुळे कामगारांची संख्याही चार ते पाच इतकीच आहे. एकेकाळी दिवसाला लाखो रुपयांची विक्री होत होती, तीच विक्री आता अवघ्या दोन हजारांवर आली आहे.

काही पतंगप्रेमी आम्हाला त्यांच्या घराजवळ पतंग उडवायलाही बोलवीत होते. आम्हीही मुंबईत विविध ठिकाणी पतंग उडविण्यासाठी जात होतो. आता पतंगबाजीमध्ये मुलांना मजा वाटत नसल्याने या व्यवसााला उतरती कळा लागली असल्याचेही ते म्हणाले.