मकर संक्रांतीच्या किमान महिन्याभरापूर्वी रंगीबेरंगी पतंग आकाशात उंच उंच घेऊन जाण्याची इच्छा खुणावत असलेल्या मुलांना हल्ली कागदी पतंगपेक्षा आभासी पतंग ‘अ‍ॅप’ले वाटत आहे. फिरकी, मांजावर फिरणारी बोटे भ्रमणध्वनीच्या स्क्रीनवर फिरू लागली आहेत. ‘गुगल प्ले स्टोअर’वरून पंतगाचा खेळ डाऊनलोड करण्याचे प्रमाण गगनाला भिडू लागले आहे. यात सर्वाधिक म्हणजे ‘काइट फायटिंग हा खेळ तब्बल एक कोटी, तर नव्यानेच आलेला ‘काइट मुंबई’ हा खेळ एक लाख पतंगप्रेमींनी डाऊनलोड केला आहे.
संक्रांतीच्या निमित्ताने यंदाही रंगीबेरंगी पतंग, मांजा, फिरकी, कंदील (आकाशात सोडणारे दिवे) यांनी बाजारपेठ सजली आहे. मोजून पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सणापूर्वी शहरात दहिसर, बोरिवली, खार, माहिम, वांद्रे, भांडुप, मुलुंड, ठाणे आदी भागांत पतंगी विहरण्यास सुरुवात झाली आहे. हे प्रमाण गेल्या सात ते आठ वर्षांच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. कारण मोकळ्या मदानांच्या जागा व्यवसायिकांकडून बळकावल्या जात असल्याने मुलांचा मदानीखेळांचा ओढा कमी होत आहे. परिणामी मुलं मदानी खेळापेक्षा भ्रमणध्वनीवर खेळ खेळण्यास पसंती देत असल्याचे कारण सर्वानाच ज्ञात आहे, असे जाणकर सांगतात. मात्र हे अर्धसत्य आहे. हल्ली पालकही मुलांना मदानी खेळापासून लांब ठेवत आहेत. मदानात मातीत खेळल्याने आजार होऊ शकतात किंवा मुलांना दुखापत होऊ शकते. या भितीपोटी मुलांना मदानात खेळायला ‘नको’ म्हटले जात आहे. ‘गुगल प्ले स्टोअर’वरच्या प्रतिक्रिया नीट वाचल्यास लक्षात येईल. मुलांना मदानात खेळायला जाऊ न दिल्याने गेम्स डाऊनलोड करत असल्याच्या प्रतिक्रिया मुलं नोंदवत आहेत. ही बाब पालकांनी लक्षात घ्यावी, असे सामाजिक विषयाचे अभ्यासक हिरेन जोशी यांनी सांगितले.

गेम्स डाऊनलोड
काइट फायटिंग १ कोटी
बॅटल काइट ५ लाख
पतंग १ लाख
काइट मुंबई १ लाख

सूर्यकिरणे डोळ्यांना लाभदायक
मकर संक्रांतीच्या काळात सूर्याची किरणे थोडी वर्क येतात. ही किरणे डोळ्यांसाठी लाभदायक असून ती डोळ्यांवर पडावी यासाठी या काळात पतंग उडवण्याची प्रथा आहे. याची आयुर्वेदातही नोंद आहे. त्यामुळे पालकांनीही मुलांना पतंग उडवण्यासाठी मदानात जाऊ द्यावे असे जोशी म्हणाले. गेल्या काही वर्षांपूर्वी काटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यांवर लांब काठी घेऊन १०-१२ मुले धावायचे आणि त्यामुळे अपघात होऊ लागले. पण मैदानात पतंग उडवायला जा असे सांगण्याऐवजी पालकांनी मुलांना त्यापासून परावृत्त केले. ही बाब लक्षात घ्यायाला हवी असे जोशी म्हणाले. मुलांनी मदानी खेळ खेळावे यासाठी हल्ली शिक्षणखात्याने पुढाकार घेतला आहे. त्याच जोडीला पालकांनीही मुलांनी मदानी खेळ खेळावे यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे ते म्हणाले.