News Flash

गुडघे प्रत्यारोपण आवाक्यात

राष्ट्रीय औषध दरनियामक प्राधिकरणाकडून नफेखोरीला लगाम

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

राष्ट्रीय औषध दरनियामक प्राधिकरणाकडून नफेखोरीला लगाम

गुडघ्यावरील शस्त्रक्रियांमध्ये होत असलेल्या रुग्णांच्या लुटीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय औषध दरनियामक प्राधिकरणाने या यंत्रसामग्रीच्या किमती चार ते ३९ हजारांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील नफेखोरीला आळा बसणार असून सर्वसामान्यांनाही या शस्त्रक्रियेचा खर्च परवडू शकणार आहे.

अपघात वा वाढत्या वयामुळे मोठय़ा प्रमाणात गुडघ्यांची वाटी बदलण्यासाठी रोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, या शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालये चार ते पाच लाख रुपये आकारत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना या शस्त्रक्रिया परवडत नव्हत्या. आता औषध दरनियामक प्राधिकरणाने या चढय़ा किमतींना आळा घातला आहे. गुडघे रोपणासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध साहित्यानुसार या किमतींमध्ये बदल करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार प्राथमिक गुडघे रोपणाच्या साहित्यासाठी चार हजारांपासून ते ३९ हजार रुपये आणि पुनर्शस्त्रक्रियेसाठी किमान चार हजार ते ६२ हजार ७७० रुपये इतकी कमाल किंमत ठरविण्यात आली आहे.

प्रत्यारोपणासाठी यंत्रसामग्री तयार करणाऱ्या कंपन्या, वितरक, रुग्णालये यांच्या नफेखोरीला आळा घालण्यासाठी या किमतींवर नियंत्रण आणण्याचे पाऊल प्राधिकरणाने उचलले आहे. नव्या किमती रुग्णालये, वितरक व उत्पादकांना तातडीने बंधनकारक करण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी प्राधिकरणाने गुडघे रोपण शस्त्रक्रियांमधील नफेखोरी समोर आणली होती. या शस्त्रक्रियेतील यंत्रसामग्रीचे वितरक व रुग्णालये मूळ किमतीपेक्षा ३१३ टक्क्य़ांपर्यंत किंमत वाढवून संपूर्ण गुडघारोपण शस्त्रक्रियेसाठी ६५,७८२ रुपयांची यंत्रसामग्री रुग्णालयांकडून ४,१३,०५९ रुपयांना विकत असल्याचे त्यात निदर्शनास आले होते. त्यात आयातदाराचा नफा ७६ टक्के व रुग्णालयाचा नफा १३५ टक्के असल्याचे प्राधिकरणाच्या आकडेवारीत नमूद करण्यात आले होते.

प्राधिकरणाच्या नियमावलीतील सूचना..

  • गुडघे रोपण साहित्याच्या उत्पादकांकडे सर्व ब्रँड्सचे साहित्य असावे
  • शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयाने दिलेल्या बिलात गुडघे रोपण साहित्याच्या किंमती, शस्त्रक्रिया व रुग्णालयाचा खर्च वेगळ्या रकान्यात लिहावा
  • रुग्णाला गुडघे रोपणाची नेमकी किंमत कळावी हा त्यामागील हेतू. गुडघे रोपणाच्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णालयांकडे अन्न व औषध प्रशासन व प्राधिकरणाकडून नोंदणीही करुन घेणे आवश्यक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 1:30 am

Web Title: knee implants surgeries to cost cuts
Next Stories
1 भाजप बैठकीवर आरोपांचे सावट
2 ध्वनिमर्यादा तर पाळावीच लागेल..
3 मान्यता नसलेल्या अभियांत्रिकी संस्थांवर ‘एआयसीटीई’ची वक्रदृष्टी!
Just Now!
X