रक्तचंदनाची तस्करी रोखणाऱ्या १३ वनअधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तस्करी करणाऱ्या आरोपीने या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर या आरोपांची चौकशी करून या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
चार महिन्यांपूर्वी रक्तचंदन तस्करी करणारा एक ट्रक वनअधिकाऱ्यांनी पकडला होता. या प्रकरणातील आरोपी राजेश पोखरकरने कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांची शहानिशा करत, चौकशीअंती १३ अधिकाऱ्यांना दोषी ठरवत वन विभागाचे वनसंरक्षक अधिकारी के. पी. सिंग यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. राजकीय दबावाखाली ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप निलंबित अधिकाऱ्यांनी केल्याने या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे.
पकडण्यात आलेल्या ट्रकमधून सुमारे १० टन रक्तचंदन जप्त करणात आले होते. या वेळी पनवेल वन विभागाचे के. जी. अलुरकर, अनिल परब यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. कारवाईच्या वेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर बंदुकीतून गोळी झाडली, बंदुकीचा धाक दाखवला, मारहाण केली, पन्नास लाख रुपये घेतल्याचा आरोप करत या प्रकरणातील आरोपी राजेशने लेखी तक्रार वन विभागाकडे केली होती. या प्रकरणी वन विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी चौकशी करून पनवेलच्या सर्व वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. राजेशसोबत अजूनही अनेक मोठे मासे या रक्तचंदनाच्या तस्करीत गुंतले आहेत. मात्र त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोहचू नयेत म्हणून हे षड्यंत्र रचल्याचा आरोप निलंबित सहायक वन संरक्षक के. जी. अलुरकर यांनी केला आहे. एका मंत्र्याशी राजेश याचे निकटचे सबंध असल्याने निलंबनाची कारवाई केल्याचा आरोप या अधिकाऱ्यांनी केला आहे. या मंत्र्याच्या स्विय साहाय्यकाने राजेश याच्या अटकेनंतर दबाव टाकल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.