News Flash

‘कोडीन फॉस्फेट’च्या दलालांचा मुंबईत वावर!

काही हायफाय शाळांतील विद्यार्थीही या दलालांचे ग्राहक असल्याचे स्पष्ट झाले आहे

मुंबई, ठाणे परिसरात ‘सिरप’रूपी कोडीन फॉस्फेटला तरुणांकडून जोरदार मागणी असून, यासाठी अनेक दलाल कार्यरत असल्याची माहिती उघड झाली आहे. काही हायफाय शाळांतील विद्यार्थीही या दलालांचे ग्राहक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमली पदार्थाची नशा देणाऱ्या कोडीन फॉस्फेटचा अंश असलेल्या सिरपचा मोठा साठा हस्तगत करणाऱ्या राज्याच्या अन्न व औषध विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी त्यास दुजोरा दिला आहे.
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोडीन फॉस्फेटचा अंतर्भाव असलेले सिपला कंपनीचे रेक्सॉफ, फायझर कंपनीचे कोरेक्स आणि रॅनबॅक्सी कंपनीचे रॅनकोडेक्सची विक्री करता येत नाही. औषधांच्या दुकानातून अशा औषधांची विक्री करणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई करण्यात आली आहे. परंतु काही दलाल या औषधांची विक्री दुप्पट-तिप्पट दराने वाट्टेल तितकी करीत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानुसार सहायक आयुक्त मंत्री यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १० ते १२ दिवस पाळत ठेवून काशिमीरा येथील फाऊंटन हॉटेलजवळ या सिरपचा समावेश असलेले आठ बॉक्स एका गाडीतून हस्तगत केले आणि दलाराम चौधरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून नालासोपारा येथे छापा टाकून सुमारे साडेचौदा हजार बाटल्या, असा मोठा साठा हस्तगत केला. हा साठा मुंबईसह पश्चिम बंगाल तसेच ईशान्य राज्यांत पाठवला जात असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
या सिरपच्या बाटल्या मान्यताप्राप्त कंपनीच्या सकृद्दर्शनी वाटत असल्या, तरी त्याच्या तपासणीसाठी बुधवारी संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आल्याचे आयुक्त डॉ. कांबळे यांनी सांगितले. हा साठा बनावट आहे किंवा नाही, हे आता सांगता येणार नाही. त्यांच्याकडे हा साठा ठेवण्यासाठी आवश्यक असलेला परवानाही नव्हता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कोडीन फॉस्फेटचा अंश असलेले हे सिरप चढय़ा दराने विकले जात होते. प्रामुख्याने कामाठीपुरा, मालवणी, गोवंडी, जोगेश्वरी, मुंब्रा आदी परिसरात मोठय़ा प्रमाणात असलेल्या दलालांमार्फत या सिरपची बेकायदा विक्री केली जात होती, असेही तपासात बाहेर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 1:14 am

Web Title: kodein fosfat used as drugs in mumbai
Next Stories
1 माहिती नाकारणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांना २५ हजारांचा दंड
2 आरोग्य हक्क जनसुनावणीत खासगी रुग्णालयांवरही कारवाई
3 वाहतूक पोलिसांची इ-चलन सेवा येत्या दीड महिन्यांत
Just Now!
X