News Flash

राज ठाकरेंचे भागीदार राजन शिरोडकर ईडी कार्यालयात दाखल; उन्मेष जोशींसोबत एकत्र चौकशी सुरु

उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांची एकत्र चौकशी केली जात आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे सुपूत्र उन्मेष जोशी यांनादेखील याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली असून सोमवारी ईडीकडून पाच तास त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान आज मंगळवारी राज ठाकरे यांचे भागीदार आणि निकटवर्तीय राजन शिरोडकर ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. उन्मेष जोशीदेखील ईडी कार्यालयात हजर असून राजन शिरोडकर आणि त्यांची एकत्र चौकशी केली जात आहे.

‘इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अॅवण्ड फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस’ने (आयएल अॅाण्ड एफएस) कोहिनूर सीटीएनएल कंपनीत केलेल्या गुंतवणुकीत कंपनीला झालेला तोटा आणि कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चरने कंपनीचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज यांना नोटीस बजावण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली असून २२ ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. ‘आयएल अॅण्ड एफएस’कडून कोहिनूर सीटीएनएल कंपनीने घेतलेल्या कर्जप्रकरणात राज यांच्या सहभागाबाबतची चौकशी ‘ईडी’ करीत आहे. दादर येथील कोहिनूर मिल नं. तीन ४२१ कोटींना खरेदी करून तेथे ‘कोहिनूर स्वेअर’ विकसित करण्यासाठी ‘कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चर’ ही कंपनी उन्मेष जोशी यांनी स्थापन केली होती. राज, उन्मेष आणि बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. परंतु नंतर राज यांनी या कंपनीतून अंग काढून घेत समभागही विकून टाकले होते. या संपूर्ण व्यवहाराची ‘ईडी’ चौकशी करत आहे.

‘कोहिनूर सीटीएनएल’मध्ये ‘आयएल अॅनण्ड एफएस’ कंपनीने कर्जस्वरूपात ८५० कोटी रुपये गुंतवले होते. या व्यवहारात कंपनीला तोटा झाला. याप्रकरणी आणि ५०० कोटींच्या मालमत्ता प्रकरणात ‘ईडी’ने गेल्या आठवडय़ातच मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

आवाज दडपण्यासाठी ‘ईडी’चा वापर – मनसे
‘ईडी’ने राज यांना बजावलेली नोटीस म्हणजे ‘राजकीय सूड’ आहे, असा आरोप मनसेने केला आहे. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले, ‘‘हे नोटीस प्रकरण म्हणजे राजकीय सूड आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचारसभा घेऊन खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या सभांचा लोकांवर मोठा परिणाम झाला. विधानसभा निवडणुकीत राज यांच्या आव्हानाला तोंड द्यावे लागू नये म्हणून ‘ईडी’ने ही नोटीस बजावली आहे.’’ आमचा आवाज दडपण्यासाठी ‘ईडी’चा एक हत्यार म्हणून वापर करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारने पूर्वग्रहातून राज यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही देशपांडे यांनी दिला.

विरोधकांची टीका
‘ईडी’ने नोटीस बजावण्याच्या कृतीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही राजकीय सूड असे म्हटले आहे. राज यांनी ईव्हीएमविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्याने त्यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.

..तर मनसेवर कारवाई -मुख्यमंत्री
राज ठाकरे यांनी कोणतीही अयोग्य गोष्ट केली नसेल तर त्यांनी घाबरण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मनसेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले, राज यांनी काही चुकीचे केले नसेल तर त्यांच्या पक्षाने सामान्य नागरिकांना त्रास देऊ नये. परंतु त्यांनी तसे काही केलेच तर त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 12:16 pm

Web Title: kohinoor mill building enforcement directorate mns president raj thackeray rajan shirodkar unmesh joshi sgy 87
Next Stories
1 खय्याम यांचे देहावसान
2 मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवात सुकर
3 ‘प्रसारमाध्यमांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य मान्य; परंतु प्रकरण संवेदनशील’
Just Now!
X