19 February 2019

News Flash

कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचा कोकण रेल्वेचा प्रकल्प

याबाबतचा प्रस्ताव कोकण रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून त्याला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.

कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचा कोकण रेल्वेचा प्रकल्प

चिपळूण-कोल्हापूर-वैभववाडी या नव्या रेल्वे मार्गिकेने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राची नाळ जोडण्याचा नवा प्रकल्प कोकण रेल्वेने तयार केला आहे. या योजनेमुळे तब्बल ६५० किलोमीटर परिसरातील गावे जोडली जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव कोकण रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून त्याला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात चिपळूण-कराड या नव्या मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्यानंतर हा मार्ग कोकण रेल्वेच उभारणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र कोकण रेल्वेने त्यापुढे एक पाऊल टाकत चिपळूण-कोल्हापूर-वैभववाडी हा रेल्वेमार्गाचा त्रिकोण तयार करण्याची योजना आखली आहे. या योजनेनुसार कोकण रेल्वे वैभववाडी ते कोल्हापूर यांदरम्यान एक मार्गिका बनवणार असून त्यामुळे चिपळूण-कोल्हापूर-वैभववाडी एकमेकांना रेल्वेने जोडले जाणार आहेत.
हे दोन्ही मार्ग एकेरी असून वैभववाडी व चिपळूण या कोकण रेल्वेमार्गावरील दोन स्थानकांवरून कोल्हापूरला जाता येईल. मात्र परत येण्यासाठी चिपळूणहून निघालेल्या माणसाला वैभववाडी गाठावे लागेल, असेही कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भानू तायल यांनी स्पष्ट केले. या ११० किलोमीटर मार्गाच्या उभारणीसाठी २५०० कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्यामुळे माल आणि प्रवासी वाहतूक या दोन्हीला चालना मिळणार आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येण्यासाठी रस्ते वाहतुकीशिवाय काहीच पर्याय नाही. मात्र चिपळूण-कराड आणि वैभववाडी-कोल्हापूर या मार्गामुळे रेल्वे हा सक्षम पर्याय उपलब्ध होईल, असे तायल यांनी स्पष्ट केले. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला असला, तरी अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही.

First Published on November 5, 2015 12:33 am

Web Title: kokan rail project on vaibhavwadi kolhapur