पावसाळ्यात काही ठिकाणी कोसळणाऱ्या दरडी आणि खचणारे मार्ग यामुळे कोकण रेल्वे विस्कळीत होत असल्याने कोकण रेल्वेने यंदा तब्बल २६ कोटी रुपये खर्चून उपाययोजना केल्या असून पावसाळ्यातही सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची हमी दिली आहे. कोकण रेल्वे मार्गाच्या जवळ रत्नागिरी आणि चिपळूण येथे दरडी कोसळण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर होतात. पोमेंडी हे त्यातील प्रमुख ठिकाण. १९९९ ते २०१३ या काळात कोकण रेल्वेने सुमारे २९३ कोटी रुपये खर्च करून अनेक उपाययोजना करूनही कोकण रेल्वेचा मार्ग पावसाळ्यात निर्धोक नसतो. या पाश्र्वभूमीवर यंदा कोकण रेल्वेने २६ कोटी रुपये खर्चून विविध उपाययोजना केल्या असून सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची हमी दिली आहे. पावसाळ्यात मार्ग निर्धोक रहावा यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, हे सांगण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन करून त्यांनी सुचविलेल्या उपायांनुसार ८७ ठिकाणी काही कामे करण्यात आली आहेत. त्यात संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी सुरक्षा भिंती उभारण्यात आल्या असून डोंगर कडे कापून हलके दगड काढून टाकणे, तेथे संरक्षक जाळ्या लावणे आदी कामे करण्यात आली आहेत.
निवसर येथे दोन वर्षे सलग पावसाळ्यात रेल्वे मार्ग खचला होता. त्यामुळे निवसर रेल्वे स्थानकापूर्वी मार्गात बदल करण्यात आला असून आता तेथे मार्ग खचणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना पाणी वाहून जाण्यासाठी नाले बांधण्यात आले आहेत. बोगद्यांमध्ये भूस्खलन होऊ नये यासाठी काँक्रीटीकरण करण्यात आले आहे.
या व्यतिरिक्त, बोगद्यांजवळ २४ तास गस्त, हवामान खात्याच्या स्थानिक कार्यालयाकडून पावसाची आगाऊ सूचना देण्यासाठी यंत्रणा, रत्नागिरी आणि कारवार येथे अतिरिक्त नियंत्रण कक्ष, पावसाळ्यामध्ये प्रत्येक विभागात खास दक्षता पथकाची गस्त, संभाव्य दरडी कोसळण्याच्या भागात सुरक्षा रक्षक तैनात ठेवणे आदी उपाय कोकण रेल्वेने केले आहेत.

काही गाडय़ांच्या वेळांमध्ये बदल
कोकण रेल्वे महामंडळाचे पावसाळी वेळापत्रक जाहीर झाले असून १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये कोकणात जाणाऱ्या गाडय़ांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
कोकणात पावसामुळे अनेकदा रेल्वे वाहतुकीवर परिणाम होत असतो. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे महामंडळाने आपल्या गाडय़ांच्या वेळा एक ते अर्धा तास अगोदर केल्या असल्याचे कोकण रेल्वेने आपल्या पत्रकात म्हटले आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या काही गाडय़ांच्या नव्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत. मडगाव-सीएसटी मांडवी एक्स्प्रेस (स. ८.३०), सावंतवाडी-दादर राज्यराणी एक्स्प्रेस (सायं. ५.३०), एर्नाकुलम-निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस (स. १०.४५), जनशताब्दी एक्स्प्रेस (दु. १२.१०), मंगलोर-एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस (दु. १२.५०), मडगाव-सीएसटी कोकणकन्या एक्स्प्रेस (दु. ४.४५), मडगाव-हापा एक्स्प्रेस (स. ७.१५) आणि मडगाव-एर्नाकुलम एक्स्प्रेस (रा. ९.००)