रिलायन्स कंपनीची शुक्रवारी झालेली सर्वसाधारण बैठक नव्या योजनांच्या घोषणेबरोबरच आणखी एका कारणामुळे चर्चेचा विषय ठरली. या बैठकीदरम्यान मुकेश अंबानी यांची आई कोकिलाबेन या काहीशा भावूक झालेल्या पहायला मिळाल्या. आज मुंबईत झालेल्या या बैठकीदरम्यान मुकेश अंबानी यांनी विविध योजनांची घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून रिलायन्सकडून जिओ ४जी फिचर फोन लॉन्च करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकीत बोलताना कंपनी मोफत जिओ फोन देण्यात येणार असल्याची घोषणा केली. याशिवाय, त्यांनी जिओला मिळत असलेल्या भरघोस यशाबद्दलही कंपनीचे तोंडभरून कौतुक केले. मात्र, या सगळ्याचे श्रेय त्यांनी आपले पिता धीरूभाई अंबानी यांना दिले. कंपनी इथपर्यंत वाटचाल करू शकली या सगळ्याचे श्रेय धीरूभाई अंबानी यांनाच जाते. त्यानंतर सभागृहात उपस्थित असलेल्या लोकांनी ‘धीरूभाई झिंदाबाद’च्या घोषणा द्यायला सुरूवात केली. त्यामुळे AGM ला उपस्थित असलेल्या कोकिलाबेन अंबानी भावूक झाल्या. धीरूभाईंच्या आठवणीने त्यांना अश्रू अनावर झाले. तेव्हा नीता अंबानी यांनी कोकिलाबेन यांच्या जवळ जात त्यांना आलिंगन दिले आणि त्यांना सावरले. या प्रसंगामुळे रिलायन्सची ४० वी सर्वसाधरण सभा नेहमीपेक्षा विशेष ठरली.

मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकीत बोलताना कंपनी मोफत जिओ फोन देण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र हा फोन विकत घेताना ग्राहकांना १ हजार ५०० रुपये द्यावे लागतील. ग्राहकाने तीन वर्षानंतर हा फोन कंपनीला परत केल्यास कंपनीकडून ग्राहकांना १ हजार ५०० रुपये परत देण्यात येतील, अशी घोषणा अंबानी यांनी केली. या योजनेचा गैरवापर होऊ नये, यासाठी ग्राहकांकडून १ हजार ५०० रुपये अनामत रक्कम म्हणून घेण्यात येणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. १५ ऑगस्टपासून रिलायन्स जिओ फोनची चाचणी सुरु होईल आणि हा फोन भारताला डिजिटल स्वातंत्र्य मिळवून देईल’, असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. दर आठवड्याला ५० लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट्य जिओने बाळगले आहे. जिओच्या फोनवर ग्राहकांना अमर्यादित डेटा मिळेल, असे अंबानी यांनी सांगितले. जिओचा अनलिमिटेड डेटा प्लान ‘धन धना धन’ केवळ १५३ रुपयांमध्ये या फोनवर उपलब्ध असणार आहे. यासोबतच या फोनवर व्हॉईस कॉल कायमस्वरुपी मोफत असणार आहेत. ५० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय कंपनीकडून बाळगण्यात आले आहे. जिओ फोन टीव्ही केबल ३०९ रुपयांमध्ये मिळणार आहे. या माध्यमातून जिओ फोन कोणत्याही टीव्हीला जोडता येऊ शकणार आहे.