दर्यावर्दी महिला संघाचा संकल्प; व्यवसायासाठी प्रशिक्षण

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाच्या भीतीमुळे परप्रांतीयांनी मुंबईतून काढता पाय घेतल्यानंतर आता मराठी बेरोजगार तरुणांनी मासे विक्रीस सुरुवात केली आहे. त्यातच काहींनी ऑनलाइन मासे विक्री सुरू केली आहे. आपल्या पारंपरिक मासळी विक्री व्यवसायातील हे नवे आव्हान पेलण्यासाठी कोळी महिलांचा दर्यावर्दी महिला संघ सज्ज झाला असून माहिती आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन कोळी समाजातील महिलांना ऑनलाइन मासे विक्रीसाठी सक्षम करण्याचा संकल्प संघाने सोडला आहे.

गेली अनेक वर्षे कोळी महिला मुंबईत ठिकठिकाणी फिरून अथवा मासळी बाजारपेठांमध्ये मासळी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. मात्र काही वर्षांपूर्वी परप्रांतीयांनी या व्यवसायात आपला जम बसविला आणि घरोघरी जाऊन ते मासळी विक्री करू लागले. याविरोधात कोळी महिलांनी आंदोलनही केले होते. मुंबईमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच अनेक परप्रांतीयांनी आपल्या गावची वाट धरली. मासळी विक्री करणारे अनेक परप्रांतीय निघून गेले. करोनामुळे टाळेबंदी लागू झाल्यानंतर अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. रोजगाराचा मार्ग शोधणाऱ्या अनेक मराठी तरुणांनी घाऊक बाजारातून मासळी आणून आपल्या परिसरात विक्री करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून काही तरुणांनी ऑनलाइन मासळी विक्री सुरू केली.

व्यवसायातील या नव्या आव्हानामुळे कोळी महिलांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. टाळेबंदी शिथिल केली असली तरी घाऊक बाजारापर्यंत मासळी आणण्यासाठी पोहोचता येत नाही. कोळी महिला तिथपर्यंत पोहोचल्या तरी त्यांना विभागात मासळी विक्रीसाठी जाता येत नाही. अशा वेळी बेरोजगार तरुणांनी या व्यवसायात केलेला प्रवेश कोळी महिलांसाठी धोक्याची घंटा बनू लागली आहे. कोळी महिलांच्या मदतीसाठी कोळी महिलांनी स्थापन केलेल्या दर्यावर्दी महिला संघाने या संकटावर मात करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संघाने कोळी महिलांना माहीमच्या मासळी बाजारात घाऊक मासे उपलब्ध केले आहेत. तर ऑनलाइन मासे विक्रीला टक्कर देण्यासाठी एक कोळी महिला सज्ज झाली आहे. १९ वर्षे माहीमच्या मासळी बाजारात मासे विकणाऱ्या पौर्णिमा मेहेर यांनी ऑनलाइन मासे विक्रीचा श्रीगणेशा केला आहे. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र जाळे उभे केले आहे.

सक्षमपणे व्यवसायाचा संकल्प

मासे विक्री व्यवसायातील सुशिक्षित महिलांचा शोध संघाने सुरू केला असून लवकरच या महिलांना ऑनलाइन व्यवसाय कसा करावा याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. व्यवसायात शिरकाव करणाऱ्याला विरोध करण्यापेक्षा आपण अधिक सक्षमपणे व्यवसाय करणे याला महत्त्व देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया दर्यावर्दी महिला संघाच्या पौर्णिमा मेहेर यांनी व्यक्त केली.