पश्चिम उपनगरांतील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी निर्विघ्नपणे कोकणातल्या आपल्या गावी जाता यावे, यासाठी कोकण आणि पश्चिम रेल्वे यांनी संयुक्तपणे विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडय़ा अहमदाबाद ते मडगाव आणि वांद्रे टर्मिनस ते मडगाव या दरम्यान चालवण्यात येणार आहेत. या गाडय़ांच्या आरक्षणाच्या तारखाही लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.
०९४१६ अहमदाबाद-मडगाव ही गाडी अहमदाबादहून १२, १३, १७, १९, २०, २४, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी सुटेल. ही गाडी अहमदाबाद येथून दुपारी चार वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ४.३० वाजता मडगावला पोहोचेल, तर ०९४१५ मडगाव-अहमदाबाद ही गाडी १३, १४, १८, २०, २१, २५, २७ आणि २८ सप्टेंबर रोजी सुटेल. ही गाडी मडगावहून रात्री नऊ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ८.३० वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. या गाडीला १८ डबे असतील.
०९००७/०९००८ वांद्रे टर्मिनस-मडगाव-वांद्रे टर्मिनस १० ते २४ सप्टेंबर या दरम्यान धावणार आहे. ०९००७ वांद्रे टर्मिनस-मडगाव ही गाडी दर सोमवार व बुधवार या दिवशी वांद्रे टर्मिनसहून सकाळी १०.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता मडगावला पोहोचेल, तर ०९००८ मडगाव-वांद्रे टर्मिनस ही गाडी दर मंगळवार व गुरुवार या दिवशी मडगावहून सकाळी ५.३० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ११.२५ वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल.
०९००९/०९०१० वांद्रे टर्मिनस-मडगाव-वांद्रे टर्मिनस ही गाडी १२ ते २६ सप्टेंबर या दरम्यान धावणार आहे. ०९००९ वांद्रे टर्मिनस-मडगाव ही गाडी दर शनिवार, मंगळवार आणि गुरुवार या दिवशी वांद्रे टर्मिनसहून मध्यरात्री १२.१५ वाजता सुटून मडगाव येथे त्याच दिवशी संध्याकाळी ४.३० वाजता पोहोचेल, तर ०९०१० मडगाव-वांद्रे टर्मिनस ही गाडी शनिवार, मंगळवार आणि गुरुवार या दिवशी मडगावहून रात्री ९.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.२० वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला अंधेरी, बोरिवली आणि वसई येथेही थांबे असतील.