गेल्या दीड वर्षापासून राज्यातील जनता करोनामुळे त्रस्त असताना आर्थिक अडचणीमुळे देखील हवालदील झाली आहे. उद्योगधंदे आणि आर्थिक नियोजन कोलमडल्यामुळे सामान्यांचं आर्थि गणित बिघडलं आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर कोंकण मंडळाने (म्हाडाचा घटक) सामान्यांना दिलासा दिला आहे. मंडळातर्फे कल्याण, मिरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत ८ हजार ९८४ घरांची विक्री करिता सोडत जाहीर करण्यात आली आहे.

या सोडतीकरीता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते मंगळवार २४ ऑगस्ट २०२१ रोजी ‘गो – लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहे. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील गुलजारीलाल नंदा सभागृहात सकाळी ११.३० वाजता सोडतीचा शुभारंभ होणार आहे.

सर्व सामान्यांचे घरांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कोंकण व क्षेत्र विकास (म्हाडा) मडळातर्फे ऑनलाईन अर्ज नोंदणी २४ ऑगस्ट दुपारी १२ वाजेपासून ते २३ सप्टेंबर रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत भरता येणार आहे. तर यासाठी सोडत १४ ऑक्टोंबर रोजी काढण्यात येणार आहे.