पुणे आणि अहमदनगर या दोन केंद्रांवरील दमदार प्राथमिक फेरीनंतर आता लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धेची प्राथमिक फेरी सोमवारी रत्नागिरी आणि औरंगाबाद या दोन केंद्रांवर रंगणार आहे. देशातील राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या टप्प्यांवर महाराष्ट्रातील वक्त्यांनी प्रभाव टाकला आहे. हीच परंपरा जोपासण्यासाठी लोकसत्ताने आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभत आहे. नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस, भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्याने तसेच जनकल्याण सहकारी बँक यांच्या मदतीने होणारी ही वक्तृत्व स्पर्धा राज्यातील आठ केंद्रांवर होणार आहे.
‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर लोकसत्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महाविद्यालयांत दडलेल्या तरुण वक्त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून अडीचशेहून अधिक महाविद्यालयांतील ५००पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
ही स्पर्धा मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, औरंगाबाद आणि नागपूर या आठ केंद्रांवर होत आहे. यापैकी पुणे आणि अहमदनगर येथील प्राथमिक फेरी शुक्रवारी मोठय़ा उत्साहात पार पडली. आता सोमवारी रत्नागिरीच्या भागोजी कीर सभागृहात आणि औरंगाबाद येथे देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत या स्पर्धेची प्राथमिक फेरी रंगेल.
प्राथमिक फेरीसाठी दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर स्पर्धकांना किमान आठ ते कमाल दहा मिनिटे भाषण करायचे आहे. विषयाचे सादरीकरण, भाषेचे सौंदर्य आणि समृद्धी आणि आशय या निकषांवर परीक्षण होणार आहे.
या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या स्पर्धकांना विभागीय अंतिम फेरीत आपले वक्तृत्वगुण सिद्ध करावे लागतील. विभागीय अंतिम फेरीदरम्यान एका महनीय वक्त्याद्वारे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.