कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्यातील समन्वयाअभावी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत असून उन्हाळी विशेष गाडय़ांचे वेळापत्रक ठरविण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मध्य रेल्वेने काही दिवसांपूर्वी ५८ विशेष फेऱ्या मडगावसाठी सोडल्यानंतर सावंतवाडीसाठी आणखी ३८ फेऱ्यांच्या प्रस्तावाची टोलवाटोलवी सुरू आहे. परिणामी कोकणात जाणाऱ्या विशेष उन्हाळी फेऱ्यांच्या संख्येत वाढ होणे लांबणीवर पडले आहे.
कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्यातील शीतयुद्ध दिवसेंदिवस उग्र होत चालले आहे. प्रवाशांच्या समस्या सोडविण्यापासून अनेक प्रश्नांबाबत कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेने अलिकडेच ५८ विशेष फेऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान जाहीर केल्या. त्यानंतर आणखी ३८ फेऱ्यांचा प्रस्ताव तयार करून वेळापत्रकासाठी कोकण रेल्वेकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाबाबत कोकण रेल्वेकडून काही थांबे वाढविण्याबाबतच्या सूचना आल्या असून त्याबाबत विचार सुरू आहे, असे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे. तर आम्ही ३८ पैकी ३७ फेऱ्यांचा प्रस्ताव गेल्याच आठवडय़ात पाठविला असून केवळ एका विशेष फेरीबाबत वेळ बदलण्यासाठी कळविले असून मध्य रेल्वेनेच वेळकाढूपणा केला असल्याचे कोकण रेल्वेचे म्हणणे आहे.
दादर-सावंतवाडी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी अशा ३८ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. त्यातील एक फेरी सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी येथून सुटून लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पहाटे ३.३० वाजता पोहोचणार आहे. मुंबईत ही वेळ अत्यंत गैरसोयीची असून त्या फेरीच्या वेळेत बदल करावा, असे कोकण रेल्वेने मध्य रेल्वेला कळविले आहे. मात्र त्याबाबत अद्याप मध्य रेल्वेने कोणताही निर्णय घेतला नसल्याचे कोकण रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.