कोकण रेल्वेचा दावा

मुंबई : कोकणसाठी धावणाऱ्या नियमित गाडय़ा आणि त्याव्यतिरिक्त मोठय़ा प्रमाणात विशेष फेऱ्या गणेशोत्सवात सोडल्याने मोठय़ा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षीपेक्षा यंदा विशेष फेऱ्या कमी सोडण्यात आल्याने ही कोंडी न होता प्रवास सुरळीत होईल, असा दावा कोकण रेल्वेने केला आहे. गेल्या वर्षी मध्य, कोकण व पश्चिम रेल्वेकडून २५० विशेष फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. यंदा फेऱ्यांची हीच संख्या २०२ पर्यंत आहे. यावेळी गाडय़ांना जादा डबे जोडण्यात आल्याने फेऱ्यांची संख्या कमी करण्यात आल्याची माहीती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.

कोकण रेल्वे मार्गावर मांडवी, कोकणकन्या, जनशताब्दी, तेजस एक्सप्रेस, डबल डेकरसह अशा रोज नियमित ५५ गाडय़ा धावतात. गणेशोत्सवकाळात या गाडय़ा हाऊसफुल होतात. होणारी गर्दी पाहता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य, कोकण व पश्चिम रेल्वेकडून विशेष फेऱ्या सोडल्या जातात. गेल्या वर्षी २५० विशेष गाडय़ा सोडल्या होत्या. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विशेष फेऱ्या सोडल्याने कोकण रेल्वेवरील वेळापत्रकाचे तीन तेराच वाजले होते. विशेष फेऱ्या तीन ते चार तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. यावेळी विशेष फेऱ्यांची संख्या मर्यादित ठेवताना जादा डबे जोडण्यावरच मध्य रेल्वे, कोकण व पश्चिम रेल्वेने भर दिला आहे. कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल.के.वर्मा यांनी यंदा २०२ विशेष फेऱ्यांचे नियोजन असून यापुढे आणखी फेऱ्या सोडण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी जादा डबे जोडण्यावर भर देण्यात आला असून त्यामुळेच विशेष फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली नसल्याची माहती त्यांनी दिली. या नियोजनामुळे गणेशोत्सव काळात वेळापत्रक सुरळीत राहिल, असा दावा त्यांनी केला आहे.