मार्गावर ६३० कर्मचाऱ्यांची गस्त, धोकादायक ठिकाणी २४ तास सुरक्षारक्षक

मुंबई : पावसाळ्यात रेल्वे सेवा सुरळीत राहण्यासाठी यंदा कोकण रेल्वेने विविध उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये वाहतुकीवर परिणाम होऊ नये आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी यासाठी ६३० कर्मचारी दिवस-रात्र गस्त घालणार आहेत.

कोकण मार्गावरील धोकादायक ठिकाणी २४ तास सुरक्षारक्षकही तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या सहा वर्षांत गाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची कोणतीही मोठी घटना घडलीच नसल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.

मुसळधार पाऊस, दरड कोसळणे इत्यादी कारणांमुळे पावसाळ्यात लांब पल्ल्यांच्या गाडय़ांचा वेग मंदावतो. यंदा पावसाळ्यात रेल्वे सेवा सुरळीत राहण्यासाठी कोकण रेल्वेने पावसाळापूर्व तयारी केली आहे. कोलाड ते ठोकूरदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या आहेत. रूळ खचणे, दरड कोसळू नये यासाठी विशेष कामे केली आहेत. मुसळधार पावसात दृश्यमानता कमी झाल्यास गाडय़ांवरील लोको पायलटला ४० किलोमीटर प्रतितास वेगाने गाडी चालवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय अपघात मदत वैद्यकीय रुग्णवाहिकादेखील तैनात केली जाणार आहे. यामध्ये शस्त्रक्रियेचीही व्यवस्था असेल, असे कोकण रेल्वे प्रशासनाने सांगितले.

रत्नागिरी, गोव्यातील वेरणात वैद्यकीय सुविधांबरोबरच अपघात मदत रेल्वेही तैनात करण्यात येणार आहे. लोको पायलट आणि गार्ड यांना एकमेकांशी तसेच जवळच्या स्थानकाशी संपर्क साधण्यासाठी वॉकीटॉकी देण्यात येईल. बेलापूर, रत्नागिरी, मडगावमध्ये २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.