मध्य व कोकण रेल्वेच्या १४२ जादा गाडय़ा

दरवर्षी लाखोंच्या संख्येने कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य व कोकण रेल्वे विशेष गाडय़ा सोडते. यंदाही मध्य व कोकण रेल्वेने जून महिन्यातच या विशेष गाडय़ांची घोषणा केली असून, या वर्षी १४२ विशेष गाडय़ा चालवण्यात येणार आहेत. या गाडय़ा २६ ऑगस्टपासून चालवण्यात येणार असून त्यांचे आरक्षण २६ जूनपासून उपलब्ध होणार आहे. गाडय़ांची माहिती व आरक्षणाची तारीख खालीलप्रमाणे.

सीएसटी-करमाळी-सीएसटी

सीएसटी-करमाळी ही गाडी २७ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर या कालावधीत गुरुवार वगळता आठवडय़ातील सहा दिवस धावणार आहे. ही गाडी मुंबईहून रात्री १२.२० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी २.३० वाजता करमाळी येथे पोहोचेल. तर करमाळी-सीएसटी ही गाडी गुरुवार वगळता आठवडय़ातील सहा दिवस करमाळीहून दुपारी ३.२५ वाजता निघून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता मुंबईला पोहोचेल. या गाडीचे आरक्षण २८ जूनपासून सुरू होणार आहे.

सीएसटी-करमाळी-सीएसटी

सीएसटी-करमाळी ही गाडी १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत दर गुरुवारी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून रात्री १२.४० वाजता (बुधवार-गुरुवारची मध्यरात्र) निघेल. ही गाडी करमाळी येथे त्याच दिवशी दुपारी २.३० वाजता पोहोचेल. तर ०१००४ अप करमाळी-सीएसटी ही गाडी दर गुरुवारी दुपारी ३.२५ वाजता निघून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता मुंबईत पोहोचेल. या गाडीचे आरक्षण ३ जुलैपासून उपलब्ध होणार आहे.

दादर-रत्नागिरी-दादर

०१०८९ डाउन दादर-रत्नागिरी ही गाडी २६ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दर शुक्रवारी दादरहून रात्री ९.४५ वाजता निघेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ६.०० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. तर ०१०९० अप रत्नागिरी-दादर ही गाडी २७ ऑगस्ट ते २४ सप्टेंबर या कालावधीत दर शनिवारी रत्नागिरीहून सकाळी ९.२० वाजता निघून त्याच दिवशी संध्याकाळी ४.४० वाजता दादरहून सुटेल.

एलटीटी-सावंतवाडी-एसटीटी

०१०३७ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी ही गाडी २५ ऑगस्ट ते २४ सप्टेंबर या काळात आठवडय़ातील सोमवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी पहाटे ५.३० वाजता निघेल. ही गाडी त्याच दिवशी संध्याकाळी ४.०० वाजता सावंतवाडीला पोहोचेल. ०१०३८ अप सावंतवाडी-एलटीटी ही गाडी २६ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर या दरम्यान आठवडय़ातील मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी सावंतवाडीहून सकाळी ६.४० वाजता निघून संध्याकाळी ६.३० वाजता मुंबईत पोहोचेल. या गाडीचे आरक्षण २६ जूनपासून उपलब्ध असेल. याशिवाय ०११०७/०११०८ पनवेल-चिपळूण-पनवेल या डेमू गाडीच्या ३६ सेवाही चालवण्यात येणार आहेत.

दादर-सावंतवाडी-दादर (२२)

दादर-सावंतवाडी ही गाडी २६ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर या कालावधीत आठवडय़ातील रविवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी दादरहून सकाळी ७.५० वाजता रवाना होईल. ही गाडी सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता पोहोचेल. तर ०१०९६ अप सावंतवाडी-दादर ही गाडी २७ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत आठवडय़ातील सोमवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी सावंतवाडीहून पहाटे ४.५० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी संध्याकाळी ४.०० वाजता दादरला पोहोचेल. या गाडीचे आरक्षण २७ जूनपासून उपलब्ध होईल.