कोकण रेल्वेवर उक्शी आणि संगमेश्वर या स्थानकांदरम्यान मालगाडी घसरल्याने विस्कळीत झालेली वाहतूक तब्बल २० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्ववत करण्यात आली. सोमवारी सकाळी झालेल्या या अपघातानंतर त्वरीत दुरुस्तीकार्य सुरू करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी ६.५० वाजता लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
उक्शी आणि संगमेश्वर स्थानकांदरम्यानच्या बोगद्यात रिकाम्या मालगाडीचे पाच डबे घसरल्याने सोमवारी कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या मार्गावरून जाणाऱ्या गाडय़ांपैकी काही गाडय़ा दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात आल्या आणि काही गाडय़ा रद्दही करण्यात आल्या. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची कुचंबणा झाली. दोन गाडय़ा कोकण रेल्वेवरील दोन स्थानकांवरच रद्द केल्याने या स्थानकांपासून मुख्य शहरांपर्यंत बससेवाही चालवण्यात आली. तसेच रद्द झालेल्या गाडय़ांतील प्रवाशांना कोकण रेल्वेने नऊ लाख १७ हजार ५७० रुपये तिकिटाच्या रकमेची परतफेड म्हणून देऊ केले आहेत.
बोगद्यात घसरलेले डबे बाजूला करण्याची प्रक्रिया खूपच किचकट असते. त्यासाठी अपघातप्रसंगी दुरुस्ती करणाऱ्या दोन रेल्वेगाडय़ा, एक वैद्यकीय मदत पुरवणारी रेल्वेगाडी, क्रेन्स, लॉरी आणि सुमारे ३०० कामगार २० तास काम करत होते. अखेर सकाळी ४.४० वाजता गाडीचे डबे बाजूला करण्यात आले. तर, त्यानंतर सकाळी ६.५० वाजता रेल्वेरुळ वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र मिळाले. त्यानंतरच वाहतूक सुरू झाली.
दरम्यान, सोमवारी अन्य मार्गावर वळवलेल्या गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, देहरादून- कोच्चुवेल्ली एक्स्प्रेस या गाडय़ा मंगळवारी पुन्हा कोकण रेल्वेमार्गावरून चालवण्यात आल्या. त्याचप्रमाणे मुंबईहून निघणाऱ्या इतर गाडय़ाही वेळेत निघाल्या.