उन्हाळी सुट्टीची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मुंबई-करमाळी या दरम्यान एक विशेष गाडी घोषित केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी या मार्गावर विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. मात्र ज्यांचा खिसा ‘जड’ आहे अशांनाच ही गाडी परवडू शकणार आहे. कारण ही संपूर्ण गाडी वातानुकूलित आहे. आणखी एक अडचणीची बाब म्हणजे या गाडीला दिवा स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही.
३ एप्रिल ते ५ जून या दरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे. ०१००१ डाउन ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून दर गुरुवारी ००.५५ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी सकाळी ११ वाजता करमाळीला पोहोचेल. ०१००२ अप ही गाडी करमाळीहून गुरुवारी दुपारी २ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे शुक्रवारी ००.२० वाजता पोहोचेल. या गाडीमध्ये एकूण १५ डब्यांचा समावेश असेल. हे सर्व डबे वातानुकूलित असतील. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे.
गणेशोत्सव, होळी आणि उन्हाळी सुटी यादरम्यान मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे यांच्यातर्फे चाकरमान्यांसाठी अनेक विशेष गाडय़ा चालवल्या जातात. मात्र या गाडय़ांपैकी एखादी गाडी वगळल्यास कोणत्याही गाडीला दिवा स्थानकात थांबा नसतो. या उन्हाळी विशेष गाडीलाही दिवा येथे थांबा नाही. कल्याण, बदलापूर, डोंबिवली, आसनगाव अशा ठिकाणच्या प्रवाशांना ठाण्यापेक्षा दिवा जास्त सोयीचे आहे. वास्तविक दिवा येथे या गाडय़ांसाठी विशेष फलाट आणि मार्ग असल्याने उपनगरीय गाडय़ांच्या वेळापत्रकात या थांब्याची अडचण येत नाही. मात्र याही वेळी रेल्वेने दिवा येथे या गाडीला थांबा दिलेला नाही.