भरती झालेल्या मूळ जिल्हय़ातील विभागात बदली द्यावी, या मागणीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळातील मुंबई आणि कोकण विभागांतील ७२७ चालकांनी गणेशोत्सवापूर्वी दोन दिवस आधी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
चालकांची संख्या अपुरी असल्यामुळे महामंडळाने २०१२ मध्ये ‘एमकेसीएल’मार्फत सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर चालकांची भरती केली होती. ठिकठिकाणच्या विभागांतील चालकांची रिक्त पदे भरली. मात्र मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे व सिंधुदुर्ग या विभागांत आवश्यक त्या संख्येने चालक उपलब्ध होऊ शकले नाहीत.
राज्यातील उर्वरित विभागांतील चालकांची बदली करण्यात आली. अपुरे मनुष्यबळ असलेल्या ठिकाणी भरती झाल्यानंतर या चालकांना मूळ ठिकाणी पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले होते; परंतु अद्यापही हे चालक दुसऱ्याच विभागात कार्यरत आहेत.