गणेशोत्सवासाठी कोकणाकरिता १२ ऑगस्टनंतरही गाडय़ा सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असला तरी करोना चाचणीच्या अटीमुळे प्रवाशांचा या फे ऱ्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे गुरूवारी (१३ ऑगस्ट) कोकणासाठी मुंबई, ठाणे, पालघरमधून एकही एसटी सुटू शकली नाही.

मुंबई बस मालक संघटनेचे सचिव हर्ष कोटक यांनी कोकणासाठी १२ ऑगस्टपर्यंत खासगी प्रवासी बसने मोठय़ा संख्येने प्रवासी गेल्याचे सांगितले. मात्र गुरुवारी एकही बस जाऊ शकली नाही,  अशी माहिती त्यांनी दिली. १२ ऑगस्टनंतर जाणाऱ्यांना प्रवासाआधी करोना चाचणी बंधनकारक करण्याचा नियम चांगला असला तरीही चाचणीसाठीचे दर  कमी करणे गरजेचे आहे. एकाच घरातून गावी जाणाऱ्या चार ते पाच जणांना प्रत्येक चाचणीमागे पैसे अदा करताना मोठा भुर्दंडही पडणार आहे. त्यामुळे यापुढे कोकणात जाणाऱ्यांची संख्यादेखिल फारच कमी असेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

दिवसभरात एकही बस मार्गस्थ नाही

गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्यांकरिता ६ ऑगस्टपासून एसटीने बस सुरु केल्या. कोकणात १२ ऑगस्टपर्यंत जाणाऱ्यांसाठी दहा दिवसांचे विलगीकरण बंधनकारक आहे. त्यामुळे बुधवापर्यंत मुंबई, ठाणे, पालघरसह अन्य विभागातून १०३ बसेस रवाना झाल्या. ५० बस गट आरक्षणासाठी (ग्रुप आरक्षण) नोंदविल्या गेल्या. मात्र १२ ऑगस्टनंतर जाणाऱ्या प्रवाशांना करोनाची चाचणी बंधनकारक आहे. प्रवाशाचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला तरच प्रवासाची मुभा असेल. परिणामी महामंडळाने कोकणासाठी २१ ऑगस्टपर्यंत गाडय़ा सोडायचे ठरविले. परंतु, गुरुवारी एकही एसटी सुटली नाही. तर २१ ऑगस्टपर्यंत अवघ्या चार ते पाच प्रवाशांनीच आरक्षण केले आहे. या प्रवाशांना प्रवासाआधी चाचणीचा अहवाल बस वाहकाला किंवा आगार प्रमुखाला सादर करणे गरजेचे आहे.