शैक्षणिक उन्नतीमुळे कोकणातील तरुण मच्छीमार व्यवसायापासून दूर
कोकणात मासेमारी हा एक प्रमुख व्यवसाय मानला जातो. परंतु शैक्षणिक उन्नतीमुळे स्थानिक तरुणांनी मासेमारी व्यवसायाकडे पाठ फिरविल्याने परप्रांतीयांनी त्याचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कधी काळी कोकणस्थांकडे असलेल्या मासेमारीचा हा सुकाणू आता परप्रांतीयांच्या हाती जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्या येथील व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

कोकणातील तरुण उच्चशिक्षित झाला आहे. मासेमारी व्यवसायात प्रचंड मेहनत करावी लागते. काही वेळा जीव धोक्यात घालून निसर्गाशी सामना करावा लागतो. तर दुसरीकडे उच्च शिक्षणामुळे आलेली प्रतिष्ठा मासेमारी करण्यात घालविणे हे तरुणांना पटत नसल्यामुळे तसेच या शिक्षणाच्या जोरावर सरकारी अथवा खासगी कार्यालयात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत असल्याने तरुणांचा कल त्याकडे झुकला आहे. परिणामी तरुणांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवून शहरात जाऊन नोकरी करण्याचा मार्ग पत्करल्याचे काही पारंपरिक व्यावसायिकांकडून सांगितले जाते.
रायगड जिल्ह्य़ातील अनेत कोळीवाडय़ात सध्या हेच चित्र पहायला मिळत आहे. चांगला पगार देऊनही बोटींवर काम करायला कोणी इच्छूक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाइलाजास्तव नेहमीच कमी पगारात काम करणाऱ्या परप्रांतीयांची मदत घेणे या व्यवसायातही भाग पडत असल्याचे येथे सांगितले जात आहे. उत्तरप्रदेश, बिहारमधील गोडय़ा पाण्यात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना आता या बोटींवर खलाशी म्हणून नेमले जात आहे. तर बोटी चालवण्याचा सराव असलेल्या तरुणांना नाखवा म्हणून नेमण्यास सुरुवात झाली आहे. हवामानातील बदल, वाढते सागरी प्रदूषण, परराज्यातील नौका, परसीयन नेट पद्धतीची मासेमारी, डिझेलचे वाढते दर, डिझेल परतावा मिळण्यास होणारा विलंब, व्यापाऱ्यांकडून होणारी अडवणूक यांसारख्या समस्यांत या आणखी एका नव्या समस्येची भर पडली आहे.

७० टक्के परप्रांतीय
एका बोटीला खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी सात ते आठ दिवस लागतात, यासाठी त्यांना तीस ते पस्तीस हजारांचे डिझेल, आठ ते दहा खलाशांचा पगार एवढा खर्च करावा लागतो. आणि हा खर्च करून चांगले मासे मिळाले नाही तर मच्छीमारांचे अर्थकारण बिघडते. अशा वेळी कमी पगारात काम करणारे परप्रांतीय नाखवा आणि खलाशी उपयुक्त ठरत असल्याचे मच्छीमार सांगतात. अलिबाग कोळीवाडय़ात सध्या तब्बल एक हजार ७५० परप्रांतीय या व्यवसायात कार्यरत आहे. रेवदंडा आणि मुरुड येथेही परप्रांतीय दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. रेवदंडा येथे ९१ आणि मुरुड येथे २७ परप्रांतीय कार्यरत असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे. नवगाव, आक्षी या परिसरांत मोठय़ा प्रमाणात परराज्यातील तरुण मासेमारी व्यवसायात दाखल झाले आहेत.
रायगड जिल्ह्यात तीन हजार ४४४ यांत्रिकी तर एक हजार ४९९ बिगर यांत्रिकी नौका आहेत. या नौकांवर जवळपास तीस ते पस्तीस हजार लोक काम करतात. यात परप्रांतीय तरुणांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. अलिबाग कोळीवाडय़ात तर बोटींवर काम करणाऱ्या कामगारांपकी जवळपास ७० टक्के जण हे परराज्यातील कामगार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोल समुद्रात मासेमारी करण्याचे कसब आता या कामगारांनी आत्मसात केले आहे. त्यामुळे त्यांची मागणी वाढली आहे.

कोळी समाजात झालेल्या शैक्षणिक उन्नतीमुळे तरुण पिढी या व्यवसायापासून दुरावत चालली आहे. त्यामुळे परराज्यातील कामगारांची मदत घेणे भाग पडते आहे. परराज्यातून येणारे हे तरुण कमी पशात काम करतात, ते काम अर्धवट सोडून जात नाहीत. स्थानिकांना जर या व्यवसायाकडे परत आणायचे असेल तर नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे लागेल.
अ‍ॅड. जे. टी. पाटील, अखिल भारतीय कोळी परिषद

कोकणातील तरुण पिढी या पारंपरिक व्यवसायात येण्यास फारशी उत्सुक नाही. मासेमारी व्यवसायाला पुरक शिक्षण पद्धती विकसित करणे गरजेचे आहे. मासेमारी व्यवसाय कोकणात आणि प्रशिक्षण संस्था विदर्भात अशी परिस्थिती आज पाहायला मिळते आहे. हे चित्र बदलले नाही तर स्थानिक लोक या व्यवसायापासून दुरावत जातील.
डॉ. कैलास चौलकर, अध्यक्ष, रायगड जिल्हा कोळी समाज संघ