वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने कोकणच्या शेतकऱ्यांची मुंबईकडे पाठ
फणस झाडावरून काढण्याचा, पाचशे किलोमीटर वाहतुकीचा, विक्रीची जागा मिळवण्याचा खर्च परवडत नाही, असे म्हणत मुंबईसारख्या मोठय़ा बाजारपेठेकडे कोकणी शेतकऱ्याने पाठ फिरवली असताना तब्बल दीड हजार किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या केरळातील फणसांनी कोकणातल्या मधुर, चवदार फणसांवर मात करत ही बाजारपेठ आपलीशी केली आहे. मुंबईत फणसाची बाजारपेठ वर्षांला तब्बल २८ हजार क्विंटल इतकी प्रचंड आहे. ही सर्व बाजारपेठ तुलनेत पचपचीत चवीच्या केरळी फणसांनी काबीज केली आहे.
उन्हाळा आला की आंबा, फणस, काजू, जाम, जांभळे अशा फळांनी बाजारपेठेचे रूपच पालटते. ही सर्व फळे कोकणाचे वैशिष्टय़. पण गेल्या काही वर्षांत बाजारपेठेत दक्षिण व उत्तरेकडच्या राज्यांनीही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. ५०० किलोमीटरचा प्रवास करून मुंबईत आणलेल्या फणसाला बाजारपेठच नसल्याचे रडगाणे कोकणी शेतकरी गात असला तरी गेल्या काही वर्षांत केरळ तसेच कर्नाटकातील फणसाने नियोजनबद्ध पद्धतीने शहरात बाजारपेठ विकसित केली.
कोकणातला फणसच उपलब्ध होत नसल्याने केरळ-तामिळनाडूतून येणाऱ्या या फणसातील गरे उत्तर भारतीयांकडून ४० रुपये पाव किलो दराने विकत घेण्यासाठी मराठी माणसे गर्दी करताना दिसतात. नवी मुंबईतील फळबाजारात वर्षभर फणसाची आवक सुरू राहते.
गेल्या वर्षभरात तब्बल २८ हजार क्विंटल फणसाची आवक मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात झाली. आधीच्या वर्षीच्या म्हणजे २०१४ च्या तुलनेत या बाजारपेठेत २० टक्के वाढ झाली. २०१६ च्या जानेवारीत (११८१ क्विंटल) गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट प्रमाणात फणसांची आवक झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अधिकाऱ्याने दिली.

केरळ, तामिळनाडूमध्ये फणसावर संशोधन करून त्याचे पीक घेतले जाते. कोकणात फणस काढताना, वाहतुकीदरम्यान शास्त्रीय पद्धत वापरली जात नसल्याने मोठे नुकसान होते. त्यामुळे कोकणातील फणस बाजारपेठेत दिसत नाही, ही स्थिती पालटण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हे शेतकरी उदासीन आहेत.
– बाळासाहेब परुळेकर , सिंधुदुर्ग ऑरगॅनिक फार्मर फाउंडेशन