राज्यात गेल्या काही दिवसांपासून एल्गार परिषदेबरोबरच कोरेगाव भीमा प्रकरण चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेसंदर्भातील तपासावर संशय व्यक्त केला होता. याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र, हा याप्रकरणाचा तपास केंद्र सरकारनं एनआयएकडे दिला. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. “कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास केंद्राकडं दिलेला नाही. देणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. सोमवारी बैठका आणि कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.

आणखी वाचा – सिंधूदुर्ग, रत्नागिरीसाठी ‘सिंधुरत्न समृद्धी’ विकास योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा

उद्धव ठाकरे म्हणाले,”एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा या दोन्ही घटना वेगळ्या आहेत. एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारनं एनआयएकडं दिला आहे. मागासवर्गीय बांधवांचा जो विषय आहे, तो कोरेगाव भीमाचा आहे. कोरेगाव भीमाचा तपास दिलेला राज्याकडेच आहे. या घटनेचा तपास केंद्र सरकारकडं दिलेला नाही. देणार नाही. मागासवर्गीय बांधवांवर मी अन्याय होऊ देणार नाही,” असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं.