News Flash

डॉक्टरांना कोरकूचे धडे

नवजात बालक आजारी पडल्यास अंधश्रद्धेमुळे गावातील भुमका या मांत्रिकाकडे आदिवासी उपचारांसाठी जातात.

(संग्रहित छायाचित्र)

मेळघाटात उपचारांसाठी अभिनव योजना

संदीप आचार्य, मुंबई

अंधश्रद्धा व शिक्षणाअभावी आजारांवरील उपचारांकरिता मांत्रिकांकडे धाव घेणाऱ्या आदिवासींशी संवाद साधण्यासाठी मेळघाटातील शासकीय आरोग्य यंत्रणेस स्थानिक कोरकू भाषेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आजार किंवा साथीच्या रोगांवरील उपचारांसाठी मांत्रिकाकडे जाण्याच्या प्रथेमुळे योग्य वैद्यकीय उपचारांना विलंब होऊन बालमृत्यू, अर्भकमृत्यू तसेच मातामृत्यू होतात. हे वास्तव लक्षात घेत मांत्रिकांचा प्रभाव रोखण्यासाठी तसेच उपचारांसाठी आदिवासींना  शासकीय वैद्यकीय यंत्रणेकडे वळवण्यासाठी मेळघाटमधील आरोग्य विभागाचे डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांना कोरकू भाषा शिकविण्याची अभिनव योजना आरोग्य विभागाने हाती घेतली आहे.

मेळघाटमध्ये होणारे बालमृत्यू आणि मातामृत्यू रोखण्यासाठी यापूर्वीही आरोग्य विभागाने अनेक योजना राबविल्या. तरीही शिक्षणाचा अभाव तसेच अंधश्रद्धेचा प्रभाव यामुळे कारकूंची बहुतेक बाळंतपणे ही घरीच होतात. नवजात बालक आजारी पडल्यास अंधश्रद्धेमुळे गावातील भुमका या मांत्रिकाकडे आदिवासी उपचारांसाठी जातात. गावातील आशांच्या आणि दाईंच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. भुमकांनीच आदिवासींना आरोग्य यंत्रणेच्या रुग्णालयात उपचारांसाठी पाठवावे यासाठी त्यांना १०० रुपये प्रति रुग्ण देण्याची योजना राबविण्यात आली. आता आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. अनुप कुमार, संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी मेळघाटमधील डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक आदींना कोरकू भाषा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत सुमारे ६० लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पात गावातील प्रमुख मंडळी ज्यात ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा तसेच भुमकांच्या मदतीने कोरकू समाजाचे जीवनमान सुधारण्याचाही कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

कोरकू भाषेची लेखी लिपी नाही. केवळ बोली भाषा असल्यामुळे स्थानिकांच्या मदतीने ऑडिओ व व्हिडीओ तयार करण्यात येणार असून जे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी ही भाषा शिकतील त्यांना सुमारे पाच हजार रुपये वेगळे मानधन देण्याचे प्रस्तावित असल्याचे डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. हे डॉक्टर तपासणीसाठी गावागावांत जाऊन कोरकू भाषेत संवाद साधतील. यातून मोठय़ा प्रमाणात गरोदर महिला, आजारी रुग्णांना आरोग्य व्यवस्थेकडे उपचारांसाठी वळवता येईल. शिवाय, भुमकांना शंभर रुपयांऐवजी ६०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचेही प्रस्तावित आहे. यामुळे मेळघाटमधील अर्भक व मातामृत्यू रोखण्यात मोठय़ा प्रमाणात यश येईल, असे आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. अनुप कुमार यांनी सांगितले.

होणार काय? 

मेळघाटमध्ये ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ९५ उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयातील तसेच भरारी पथकांतील सुमारे ४५० डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक आदींना कोरकू  भाषा शिकविण्याचा उपक्रम तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. कोरकू भाषेची लिपी नसल्यामुळे कोरकू स्थानिकांच्या ध्वनी-चित्रफितींवरून ती डॉक्टरांना शिकावी लागेल.

व्याप्ती किती?

चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांत सुमारे ३१४ गावे असून आदिवासी लोकसंख्येत कोरकूंचे प्रमाण जवळपास ९० टक्के एवढे आहे. याशिवाय गोंड, मांडिया आदी आदिवासी जमातींचेही लोक येथे राहतात. धारणीमध्ये एक लाख ९३ हजार कोरकू आहेत, तर चिखलदरा येथे एक लाख १० हजार आदिवासी लोकसंख्या आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 3:04 am

Web Title: korku language training to the doctor in melghat zws 70
Next Stories
1 नागरिक नोंदणीतून समाजांत फूट पाडण्याचा डाव
2 गृहप्रकल्पातील एकटय़ा ग्राहकाला यापुढे न्यायाधिकरणापुढे दाद मागण्यास प्रतिबंध!
3 काँग्रेसचा उद्या ‘संविधान बचाव ध्वज संचलन मोर्चा’