कृषीपंप वीजजोडणीसाठी महावितरणची मोहीम

मुंबई : राज्यातील कृषी ग्राहकांना नवीन वीजजोडणी, दिवसा ८ तास सौर कृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा, कृषी ग्राहकांना थकबाकीत सूट देऊन मोठा दिलासा देण्यात येत असून या सर्व गोष्टी राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी १ मार्च ते १४  एप्रिलपर्यंत राज्यात ‘कृषी ऊर्जा पर्व‘ ही मोहीम महावितरण राबवणार आहे. यानिमित्ताने माझे वीजबिल माझी जबाबदारी ही मोहीमही सुरू करण्यात येणार आहे.

या मोहिमेत संबंधित जिल्यांचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व कृषी ग्राहक प्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हा, तालुका स्तरावर व मोठ्या गावांमध्ये कृषी वीज ग्राहक मेळावे आयोजित केले जाणार आहेत. यात ‘माझे वीजबिल, माझी जबाबदारी’ मोहिमेस सुरुवात केली जाणार असून, थकबाकीमुक्त झालेल्या ग्राहकांचा सत्कार, नवीन कृषी ग्राहकांना वीजजोडणी मंजुरीचे पत्र व अंदाजपत्रक, वीजजोडणी प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. याबरोबरच ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषदांच्या समन्वयाने ग्रामसभा आयोजित करून त्यात कृषी वीज धोरणाची माहिती दिली जाणार आहे.

तर ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून थकबाकी भरणाऱ्या महिलांचा सत्कार, महिलांच्या नावावर वीजजोडणीस प्राधान्य, थकबाकी वसुली करणाऱ्या महिला सरपंचांचा तसेच महिला जनमित्रांचा व ऊर्जामित्रांचा सत्कार, महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, महिला बचत गटांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. धोरणाच्या प्रचारासाठी जिल्हा परिषदा, जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील व पंचायत समिती कार्यालये, बस स्थानके, रेल्वे स्थानके, कृषी बाजारपेठा, मार्केट यार्ड, जत्रेची ठिकाणे, आठवडी बाजारांत फलक लावण्यात येणार आहेत. गाव पातळीवर दवंडीद्वारे प्रचार केला जाणार आहे. जवळपास दीड महिना चालणाऱ्या या मोहिमेद्वारे जनजागृती करून महावितरणतर्फे कृषी वीज ग्राहकांना वीजबिल भरण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे.