राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांना जाहीर करण्यात आला आहे. संगीत आणि गायन क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या कलाकाराला देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप रोख ५ लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.
कृष्णा कल्ले यांनी १९६० पासून आकाशवाणीवर ‘अ’ श्रेणी गायिका म्हणून काम केले. त्यांनी १०० मराठी आणि २०० हिंदी चित्रपटगीतांना त्यांनी आवाज दिला असून शंभरहून अधिक भजने, भक्तिगीते व गझला गायल्या आहेत. त्यांना जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते युवक महोत्सवातील पुरस्कार आणि प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते १९५७ साली गायनाचा पुरस्कार मिळाला होता. १९५८ साली अ.भा. सुगम संगीत स्पर्धेत प्रथम पारितोषिक, सेहगल मेमोरियलतर्फे दिला जाणारा ‘गोल्डन व्हॉईस’ पुरस्कार, तसेच पी. सावळाराम प्रतिष्ठान आणि ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारा ‘गंगा जमुना पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 यापूर्वी गजानन वाटवे, पं. जितेंद्र अभिषेकी, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, मन्ना डे, खय्याम, सुमन कल्याणपूर यांच्यासह अनेक नामवंत कलाकार या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
याशिवाय, शासनाचा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार धुळे जिल्ह्य़ाच्या शिरपूर तालुक्यातील ज्येष्ठ तमाशा कलावंत भीमराव तोताराम गोपाळ उर्फ भिमाभाऊ सांगवीकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
 तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या कलाकाराला हा पुरस्कार दिला जातो. रोख ५ लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. भिका सांगवीकर हे लोकनाटय़ तमाशा मंडळाच्या माध्यमातून गेली ४२ वर्षे लोककलेचा वारसा पुढे नेत आहेत. सामाजिक बांधीलकीतून त्यांनी शाळा व देवस्थानांच्या इमारतींसाठी मदतही केलेली आहे.