पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी कुर्ला ते माटुंगा दरम्यानचे तीन पूल पाडणार

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाकडे मंजुरीला गेला असून या प्रकल्पाचे कामही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, हे काम सुरू झाल्यानंतर मुंबईकरांची डोकेदुखी वाढणार आहे. पहिल्या टप्प्यात कुर्ला ते परळ यांदरम्यान हे काम होणार असून त्यासाठी कुर्ला ते माटुंगा या स्थानकांदरम्यान तीन उड्डाणपूल पाडून पुन्हा बांधावे लागणार आहेत. हे पूल मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीसाठी महत्त्वाचे असल्याने ते पाडल्यानंतर मुंबईतील रस्त्यांवर गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांमध्ये होणार असून त्यातील पहिला टप्पा कुर्ला ते परळ असा आहे. कुर्ला येथे हार्बर मार्ग उन्नत करण्यात येणार आहे. त्यानंतर शीव स्थानकातील उड्डाणपूल, शीव येथील सरकारी रुग्णालयाजवळील उड्डाणपूल आणि किंग्ज सर्कल येथील रेल्वे ज्या पुलावरून जाते तो पूल, असे तीन पूल पाडण्याची गरज आहे. नव्या मार्गिका सध्याच्या डाउन धीम्या मार्गाच्या, म्हणजेच पश्चिम दिशेला तयार होणार आहेत. त्यामुळे या पुलांखाली जागा निर्माण करण्यासाठी हे पूल पाडून ते पश्चिमेला रेल्वे हद्दीच्या बाहेर पुढे उतरवावे लागतील, असे मध्य रेल्वेच्या प्रकल्प अधिकाऱ्याने सांगितले.

परळ आणि एल्फिन्स्टन रोड यांदरम्यान असलेल्या दोन रिकाम्या मार्गिकांचा वापर पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी होईल. त्यानंतर या दोन मार्गिका दादर स्थानकात मध्य आणि पश्चिम रेल्वे या दोहोंमध्ये सध्या असलेल्या रिकाम्या जागेतून पुढे नेल्या जातील. माटुंगा स्थानकात रेल्वेचेच मोठे कारशेड असल्याने तेथेही जागा उपलब्ध आहे. मात्र पश्चिमेकडून या मार्गिका पुढे घेताना किंग्ज सर्कल येथे असलेला रेल्वेचा पूल, शीव-माटुंगा यांमध्ये येणारा उड्डाणपूल आणि शीव स्थानकातील उड्डाणपूल या मार्गिकांच्या मध्ये येणार आहेत. या पुलाखालील भाग पाडून या मार्गिका तेथून नेल्या जातील. पण केवळ पुलाखालील भाग पाडल्यास पुलासाठी ते धोकादायक ठरेल. त्यामुळे रेल्वेने हे तीनही पूल पूर्णपणे पाडून पुन्हा बांधण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

यापैकी किंग्ज सर्कलचा पूल रेल्वेच्या हद्दीत येत असल्याने तेथे रेल्वेला कोणत्याही सरकारी आस्थापनांची परवानगी घेण्याची गरज नसल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मात्र इतर दोन पुलांसाठी महापालिका, वाहतूक पोलीस आदींची परवानगी आवश्यक आहे.

रस्ते वाहतुकीचे तीन तेरा

’ शीव स्थानक आणि शीव-माटुंगा दरम्यानच्या पुलांवरून सध्या दिवसभरात बेस्टच्या ५०० ते ५५० सेवा ये-जा करतात. त्याशिवाय दिवसभरात लाखो वाहने या पुलांवरून जातात. शीव येथील सरकारी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिकांसमोरही पूल पडल्यानंतर मोठा प्रश्न उभा राहणार आहे. तसेच पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीतली अभूतपूर्व वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन्ही पूल एकाच वेळी पाडण्यास वाहतूक विभाग परवानगी देण्याची शक्यता खूपच कमी आहे, अशी कबुलीही या अधिकाऱ्याने दिली. मात्र हे पूल पाडून परत बांधल्याशिवाय पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प पुढे सरकण्याची शक्यता नसल्याचेही त्याने सांगितले.