वाढीव खर्चाला मंत्रिमंडळाची मान्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : साधारणत: चाळीस वर्षांपूर्वी ३१ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प असलेला कुकुडी पाटबंधारे प्रकल्प आता ४० वर्षांनंतर चार हजार कोटींवर गेला आहे. राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी या प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली.

या प्रकल्पाची बहुतांश कामे पूर्ण झालेली आहेत. सर्व धरणांची कामे पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत आहे. मात्र कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत अस्तरीकरणाअभावी सिंचनासाठी आवश्यक पाणी पोहोचत नसल्यामुळे शेवटाकडील भागातील शेतकऱ्यांना प्रकल्पाचा लाभ मिळत नाही. त्यासाठी प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे  प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

पुणे, अहमदनगर व सोलापूर जिह्य़ातील सात दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या सिंचनासाठी १९६६ मध्ये कुकडी पाटबंधारे प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. त्याचा सुरुवातीचा खर्च ३१ कोटी रुपये होता. नंतर सतत त्याच्या सुधारित खर्चाचे प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर येत गेले. आता तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार ३९४८ कोटी १७ लाख रुपये वाढीव खर्चाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.  कुकडी पाटबंधारे प्रकल्पात येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे व पिंपळगाव जोगे या धरणांचा समावेश आहे.

या पाच धरणांचा एकूण उपयुक्त पाणीसाठा ८६४. ४८ दशलक्ष घनमीटर इतका आहे. पुणे जिह्य़ातीलआंबेगाव, जुन्नर व शिरूर, अहमदनगर जिह्यतील पारनेर, श्रीगोंदा व कर्जत, सोलापूर जिह्य़ातील करमाळा अशा सात अवर्षणप्रवण तालुक्यातील एकूण १ लाख ४४  हजार ९१२ हेक्टर क्षेत्रास या प्रकल्पातील विविध कालव्यांद्वारे सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kukadi major irrigation project cost reach over four thousand crores
First published on: 19-09-2018 at 02:49 IST