मुंबई : दादरसारख्या मध्यमवर्गीय वस्तीत सुग्रास भोजनासह आपल्या आदरातिथ्याने अफाट गोतावळा निर्माण करीत पाच दशकांतील मुंबईच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक पटलावरच्या बदलांचे साक्षीदार ठरलेले हॉटेल व्यावसायिक कुलवंतसिंग कोहली (८५) यांचे बुधवारी निधन झाले. ‘प्रीतम’ या रेस्टॉरन्टचा डोलारा उभारून त्यांनी देशभरातील नामांकित आणि तारांकित वर्तुळात आपले स्थान निर्माण केले होते. ‘लोकसत्ता’मध्ये विस्तृत अनुभवांवर आधारित त्यांचे साप्ताहिक सदर वाचकप्रिय ठरले होते.

दीर्घकाळ हृदयाच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या कुलवंतसिंग यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हिंदूुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.  त्यांचे पार्थिव गुरुवारी दुपारी ३ वाजता प्रीतम हॉटेलपासून शिवाजी पार्कपर्यंत नेण्यात येणार असून शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

लोकांच्या पोटात शिरून त्यांच्या मनात जागा निर्माण करणाऱ्या कुलवंतसिंग कोहली यांनी दादरच्या मध्यमवर्गीय जनांपासून, बॉलीवूड, साहित्यविश्वातील अगणित माणसे गोळा केली होती. त्यांना भेटलेल्या कलंदर व्यक्तिमत्वांच्या, आजूबाजूला बदलत गेलेल्या मुंबईच्या, चित्रपटसृष्टीच्या अशा अनेक आठवणींचा पट त्यांनी गेल्यावर्षी ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीतील ‘मुंबई मेरी जान’ या स्तंभातून उलगडला होता.

मूळचे रावळपिंडीचे असलेले कोहली कुटुंब मुंबईत आले खरे, मात्र कुलवंतसिंग यांच्या वडिलांनी इथून परत जायचा निर्णय घेतला. परतीच्या या प्रवासाआधीच कुलवंतसिंग यांच्या मातोश्रींनी दादरमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली. दादरमध्येच कोहली कुटुंबाने दहा बाय दहाच्या छोटय़ाशा गाळ्यात प्रीतम पंजाब हिंदू हॉटेलची सुरुवात केली होती. कुलवंतसिंग यांना मात्र प्रीतमच्या नावाला जोडलेला हा हॉटेल शब्द फारसा रुचत नव्हता. अखेर १९५५ मध्ये प्रीतमच्या नावातील हॉटेल हा शब्द गेला आणि प्रीतम रेस्टॉरन्ट या नावाने ते पुन्हा मोठय़ा प्रमाणावर कार्यरत झाले. इराणी हॉटेल्सची चलती असलेल्या मुंबईत त्याकाळी पंजाबी जेवणाचे हॉटेल चालवणे फारसे सोपे नव्हते. मात्र, मुंबईत नसली तरी दादरकरांना पंजाबी जेवणाची सवय प्रीतमनेच लावली, असे कुलवंतसिंग अभिमानाने सांगत असत.

प्रीतम हा त्याकाळी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार, दिग्दर्शक यांचा अड्डा होता. प्रीतमच्या सुरुवातीच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत संघर्ष करणारी अनेक कलाकार मंडळी तिथे येऊन बसत असत. चित्रपटावरच्या चर्चा आणि खाणे यानिमित्ताने रोजची झालेली ही मंडळी  ‘स्टार’ कलाकार म्हणून नावाजल्यानंतरही  प्रीतममध्ये येत राहिली.  आपल्या आईवडिलांनी जी शिकवण दिली, ज्या पद्धतीची वैचारिक जडणघडण दिली त्यामुळेच आजही कोहली परिवार एकत्रितपणे हा व्यवसाय सांभाळतो आहे, असे ते सांगत. प्रीतमच्या कर्मचाऱ्यांवरही त्यांनी कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच प्रेम केले. प्रीतमच्या जुन्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी एक ट्रस्ट स्थापन केला होता, या ट्रस्ट अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च केला जातो. त्यांनी प्रेमाने जोडलेली, जपलेली खूप माणसे होती. त्यामुळेच की काय बुधवारी त्यांचे पार्थिव प्रीतमच्या परिसरात आल्यानंतर सगळीकडे शोककळा पसरली होती. आपल्या घरातील वडिलधारा माणूस आपल्याला सोडून जावा, या भावनेने हा परिसर सुन्न झाला..

बहुआयामी व्यक्तिमत्त्व..

आपल्याशी जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक माणसातील वेगळेपणा जोखणाऱ्या कुलवंतसिंग यांनी केवळ हॉटेल व्यवसायच मोठा केला नाही, तर एक उत्तम, रसरशीत जगण्याचा आनंद अनुभवणाऱ्या या दर्दी माणसाने आयुष्य कसे जगावे याचे उत्तम उदाहरण लोकांसमोर ठेवले. अतिशय विनम्र स्वभावाच्या कुलवंतसिंग यांनी मुंबईचे शेरीफ पदही भूषवले आहे.  मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्य असलेल्या कुलवंतसिंग यांच्या प्रयत्नांतून मुंबईत पहिल्यांदा गुरू नानक रुग्णालय उभे राहिले. ते चित्रपटांचेही दर्दी होते. संगीता फिल्म्स या त्यांच्या निर्मितीसंस्थेअंतर्गत त्यांनी ‘पाकिजा’, ‘द बर्निग ट्रेन’सारख्या चित्रपटांना आर्थिक साहाय्य केले होते.