जीएसटी भवनाला लागलेल्या आगीत शिपाई कुणाल जाधव यांनी प्रसंगावधान राखत नवव्या मजल्यावर असलेला राष्ट्रध्वज सुरक्षित उतरवला. शिपाई कुणाल जाधव यांनी दाखवलेल्या या शौर्याचं चांगलंच कौतुक होतं आहे. आज दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान मुंबईतील माझगाव या ठिकाणी असलेल्या जीएसटी भवनाला आग लागली. सातव्या आणि आठव्या मजल्यावर ही आग लागली. आगीचे लोळ हळूहळू तिरंग्यापर्यंत पोहचू लागले होते. मात्र याचवेळी प्रसंगावधान राखत शिपाई कुणाल जाधव यांनी हा तिरंगा स्वतःचा जीव धोक्यात घालून सन्मानपूर्वक खाली उतरवला.

“आपल्या देशाच्या झेंड्यापर्यंत आगीचे लोळ जात होते हे पाहून माझं मन हेलावलं आणि देशप्रेमाच्या भावनेतून आपण हा तिरंगा सन्मानपूर्वक खाली उतरवला.” असं कुणाल यांनी सांगितलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. जीएसटी भवनाला लागलेली आग आता आटोक्यात आली आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला तीन तास लागले.

कुणाल जाधव हे गेल्या १६ वर्षांपासून जीएसटी भवनात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. ज्यावेळी ही आग लागली तेव्हा नवव्या मजल्यावर असलेल्या तिरंग्यापर्यंत ती पोहचली असती. हा धोका लक्षात घेऊन कुणाल जाधव यांनी तातडीने नवव्या मजल्यावर जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या देशाचा राष्ट्रध्वज आगीपासून वाचवला. आज लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी २० बंब घटनास्थळी दाखल झाले होते. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे.

दरम्यान ही आग लागल्याचं समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. अजित पवार हे एका महत्त्वाच्या बैठकीत होते. मात्र त्यांनी ही बैठक सोडून घटनास्थळी गेले आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. या ठिकाणी धूर जास्त असल्याने आग नियंत्रणात आणण्यास अडचणी येत होत्या. मात्र आता ही आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे. दरम्यान इतकी भीषण आग लागलेली असतानाही स्वतःचा जीव धोक्यात घालून तिरंग्याचे रक्षण करणारे कुणाल जाधव यांचं कौतुक होतं आहे.