प्रेमसंबंधातून अभिषेक यादव (१५) या तरुणाची हत्या केल्याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले आहे. ही हत्या ‘ऑनर किलिंग’चा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले .
अभिषेक हा उत्तर प्रदेशाच्या जौनपूर जिल्ह्यातील गोणोली गावी रहात होता. त्याचे रितू नावाच्या तरुणीशी प्रेमसंबध होते. त्यास रितूच्या वडिलांचा विरोध होता. मात्र तरीहीअभिषेक २६ मे रोजी रितूला घेऊन मुंबईत आला. हे समजताच रितूचे वडील गुलाब यादव यांनी या दोघांना लगेच ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्या मित्रांनी अभिषेकच्या कुटुंबियांना ही बाब कळविली. दरम्यान,  गुलाब यादव, काका सुभाष यादव आणि त्यांच्या कांदिवलीच्या कारखान्यातील एक कामगार अशा तिघांनी वसईच्या जंगलात नेऊन अभिषेकची हत्या केली. दुसरीकडे अभिषेकच्या कुटुंबियांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देऊन अभिषेकचा शोध सुरू केला होता. तेथून हे प्रकरण कुर्ला रेल्वे पोलिसांकडे आले. अभिषेकचा शोध घेताना पोलिसांनी गुलाब यादवच्या कांदिवलीतील कारख्यान्यात छापा घातला होता. यादवच्या मोबाईलच्या ठिकाणावरून अभिषेकची हत्या वसईच्या जंगलाच केल्याची माहिती मिळाली.  याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून कारखान्यातील कामगारास ताब्यात घेतले आहे.