मुंबई विद्यापीठाच्या कायदा शाखेच्या (एलएलबी) जवळपास सतराशे विद्यार्थ्यांना परीक्षा उशीरा सुरू झाल्याने गुरुवारी त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. चर्चगेटमधील दोन परीक्षा केंद्रांवर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी कोंबल्याने हा प्रकार घडला. विद्यार्थी जास्त असल्याने प्रश्नपत्रिका वेळेत छापून झाल्या नाहीत. परिणामी परीक्षेचे वेळापत्रक पाळणे या केंद्रांला शक्य झाले नाही.
चर्चगेटच्या सरकारी विधी महाविद्यालयात (जीएलसी) आणि सिद्धार्थ विधी महाविद्यालयात गुरूवारी हा प्रकार घडला.  जीएलसीमध्ये विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तब्बल ११०० विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे आयोजन केले होते. पण, एलएलएमची परीक्षा सुरू असल्याने आम्हाला इतक्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता येणे शक्य नाही, असे महाविद्यालयाच्या प्रशासनाने विद्यापीठाला पत्र लिहून कळविले. परंतु, हे सर्व सोपस्कार करेपर्यंत उशीर झाला होता.  कारण, विद्यापीठाने विद्यार्थ्यांना त्याचे परीक्षा केंद्र आधीच कळवून टाकले होते. त्या प्रमाणे प्रवेशपत्रेही वाटण्यात आली.
या गोंधळावर उपाय म्हणून महाविद्यालयाने एका बाकावर दोन वेगवेगळ्या (एलएलएम आणि एलएलबी) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसवून मार्ग काढला. परंतु, विद्यार्थी संख्या जास्त असल्याने प्रश्नपत्रिका वेळेत छापणे महाविद्यालयाला शक्य झाले नाही.  परिणामी परीक्षा उशीराने सुरू झाली.
परीक्षा वेळेत सुरू होणे शक्य नसल्याने पर्यवेक्षकांनी वर्गात येऊन जाहीर केले की, ‘तुमच्यासााठी आनंदाची बातमी आहे. त्यांना परीक्षेच्या तयारीसाठी थोडा वेळ लागणार असल्याने तुम्ही आणखी थोडा वेळ सराव करू शकता.’ जीएलसीमध्ये पाचव्या सत्रासाठी ‘सिव्हील प्रोसिजर कोड अ‍ॅण्ड लिमिटेशन्स अ‍ॅक्ट’ या विषयाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांने ही माहिती दिली.
प्रश्नपत्रिका वेळेत छापून न झाल्याने परीक्षा वेळेत सुरू करता आली नाही, याला जीएलसीचे प्रभारी प्राचार्य प्रकाश मोकल यांनी दुजोरा दिला. परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्याच्या काही तास आधी ऑनलाइन पाठविली जाते. या प्रश्नपत्रिकेची प्रिंटआऊट घेऊन त्याच्या फोटोकॉपी विद्यार्थ्यांना वाटल्या जातात. मात्र, विद्यार्थी संख्या जास्त असल्याने फोटोकॉपी वेळेत घेता येणे शक्य झाले नाही. परिणामी परीक्षा २० मिनिटे उशीराने सुरू करावी लागली, असे मोकल यांनी स्पष्ट केले.
लेबर लॉ या विषयाची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्यांने परीक्षा तब्बल ४० मिनिटे उशिराने सुरू झाली, असे सांगितले. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे सल्लागार प्रकाश वाणी त्यांनीही हा प्रकार घडल्याचे मान्य केले. परीक्षार्थीच्या तुलनेत सुविधा कमी असल्याने तेथे हा प्रकार घडला, असे त्यांनी सांगितले. जीएलसीमध्ये सॉफ्टवेअर तर सिद्धार्थमध्ये छपाई यंत्रणा बिघडल्याने हा प्रकार घडल्याचा खुलासा त्यांनी केला. मात्र, विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ दिला गेल्याने कुणाचेही नुकसान झाले नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.