इसाक चेटिनार : सध्याच्या घडीला तुम्ही काय लिहिताय?

व्ही. एस. नायपॉल : माझं खूप वय झालंय (हसतात).

इसाक : म्हणजे आता काहीच नाही का?

नायपॉल : जेव्हा तुम्ही ऐंशी वर्षांचे असता तेव्हा तुमच्याकडे सांगण्यासारखं फारसं काही नसतं. तुला ऐंशी वर्षांचा एखादा लेखक माहीत आहे का?

इसाक : मी विचारच करतोय. नाही.

नायपॉल : बरोबर आहे. वयाच्या ऐंशीव्या वर्षी कोणाकडे लिहायची इच्छा असते? जर एखाद्या माणसाने वयाच्या तिशीत लिहिणं सुरू केलं तर पन्नाशी किंवा साठीच्या घरात येईपर्यंत त्याला जे सांगायचं असतं ते सांगून झालेलं असतं. ऐंशीच्या घरात येईपर्यंत त्याच्याकडे सांगण्यासारखं फार काही उरलेलंच नसतं, कळलं?

इसाक : पण तुम्ही तर वयाच्या साठीनंतर बरीच पुस्तकं लिहिलीत.

नायपॉल : हो, हो, मी लिहिलीयत. कारण ते सगळं सांगणं मला भाग होतं.

इसाक : मुस्लीम जगातले असे काही देश आहेत, ज्याबद्दल तुम्हाला आशावादी वाटतं?

नायपॉल : मला नाही वाटत की आशावाद, निराशावाद.. या शब्दांना फार अर्थ नसतो.. भोवताली काय घडतंय हे बघणं महत्त्वाचं. मी १९८० साली इंडोनेशियात गेलो तेव्हा मला तो देश भावला होता. तिथली संस्कृती फार आकर्षक वाटली होती मला. त्या लोकांना मी जेव्हा भेटलो तेव्हा माझी त्यांच्याशी छान तार जुळली होती; पण त्या भेटीनंतर ती माणसं जास्तच धार्मिक झालीत. त्यांना इस्लामबद्दल फार आस्था वाटू लागली. त्यामुळे त्यांची नाही म्हटलं तरी थोडी अधोगतीच झाली.

इसाक : तुम्ही स्वत:ला धार्मिक समजत नाही, ठीक आहे नं?

नायपॉल : मी धार्मिक नाही, अजिबात नाही.

इसाक : तुम्हाला नास्तिकतावादात रस आहे का?

नायपॉल : ओह.. नाही.. नाही.. अजिबात नाही. तुम्ही एकाच वेळी नास्तिक आणि कुठली तरी विचारधारा (आयडियालॉजी) कशी बरं मानू शकता? नास्तिक होणं म्हणजे काही श्रद्धांपासून मुक्त होणं. असं मुक्त होणं म्हणजे विचारधारा मानणं कसं बरं होईल?

इसाक : तुमच्या जगभराच्या प्रवासात तुम्ही जे समाज बघितले त्यात सुधारणा कराव्यात असं तुम्हाला कधी तीव्रपणे वाटलं?

नायपॉल : मनात सुधारणावादी विचार घेऊन मी कधी प्रवास केला नाही. मी ते सगळं निरखून बघितलं आणि म्हटलं, ‘इथे ही माणसं असं करतात. इथली माणसं असा विचार करतात.’ त्यामध्ये काही सुधारणा व्हाव्यात, असं मी म्हणणार नाही. सुधारणा या लोकांमधून यायला हव्यात. त्या लोकांवर लादल्या जाऊ शकत नाहीत.

इसाक : तुम्ही भारताबद्दल तीन तीन पुस्तकं लिहिलीत म्हणून मला उत्सुकता वाटते. भारताबद्दल तुम्हाला काही..

नायपॉल : मी भारताबद्दलच्या बातम्या वाचत नाही. आज मला भारताबद्दल काही माहीत नाही.

इसाक : बऱ्याच अर्थाने भारत बदललेला आहे. तुम्ही १९६४ साली प्रथम भारतावर पुस्तक लिहिलं, त्या वेळेपासून तो देश बदललेला आहे.

नायपॉल: मला शंकाच आहे तू काय म्हणतोय त्याबद्दल. चाळीस-पन्नास वर्षांत भारतासारखा देश चटकन बदलू शकतो? मला नाही वाटत. हा तोच देश आहे का जिथे उथळ.. (थांबतात). तू या सगळ्यात कुठे उभा आहे हे मी तुला विचारायला हवं, म्हणजे तुझे हे सगळे प्रश्न नेमके कुठून येतायेत ते मला कळेल.

इसाक : सध्या जे काही लेखक लिहितायत, त्यापैकी तुम्हाला कोणात रस आहे?

नायपॉल : मला वाटतं, सुरुवातीपासून तुला हेच विचारायचं होतं. तुला असं सुचवायचं आहे की, तोच वाचक खरा जो चालू लेखकांची माहिती ठेवतो, पण मी का वाचतो हे तुला आधीच सांगून टाकलं आहे. साहित्याच्या इतिहासाचं माझं ज्ञान वाढावं म्हणून मी वाचतो. मी अलाण्याफलाण्या कादंबऱ्या वाचल्या आहेत, हे सांगायला मी भसाभसा पुस्तकं वाचून माझा वेळ बरबाद करणार नाही. मी जे बोलतोय ते तुला कसं वाटतं? मी एक चिल्लर माणूस आहे असं तुला वाटतं का?

इसाक : अजिबात नाही. मला तुम्हाला लिखाणाबद्दल विचारायचं आहे. तुमच्या एका पुस्तकात अशा एका माणसाचं वर्णन तुम्ही केलंय ज्याची खासियत म्हणजे त्याला लोकांचे दोष दिसतात. असे दोष बघणं लेखकासाठी उपयुक्त असतं का?

नायपॉल : तेव्हा मी खूप तरुण असताना माझ्याबद्दलच बोलत होतो. मी अगदी लहान मुलगा असतानासुद्धा मला लोकांचे दोष दिसायचे. हे सगळं मला आधीपासून, खूपच लहानपणापासून दिसायचं. हे चांगलंच की वाईट, मला माहीत नाही. मात्र मला लोकांचे दोष चटकन दिसायचे हे खरंय.

इसाक : एक लेखक म्हणून तुम्हाला कुठले फायदे महत्त्वाचे वाटतात?

नायपॉल : लिहिणं हाच खरा फायदा. मी फक्त माझ्यापुरतेच बोलतोय इथे. ‘अमंग द बिलिव्हर्स’सारखं मोठं आणि कठीण पुस्तक सुरू करताना मला जो आनंद मिळतो, तो विरळाच. अशा पुस्तकांवर मी काम सुरू केलं, की हे सगळं कुठल्या दिशेने जातंय हे मला कळतं. त्यातून मी मला गवसतो. मला खूप आनंद मिळतो. मी सुखाने न्हाऊन निघतो. हे सगळं लेखक आणि लिखाणाशी संबंधित आहे. लेखक त्याच्या लिखाणातून कुठला मार्ग काढतो आणि तो मार्ग कुठे संपतो हे सगळं थरारक आहे असं काही लोकांच्या बाबतीत होत नसतं. याला काही अर्थ नसतो. तुझ्या मते असतो का? बहुधा लोकांच्या बाबतीत असं थरारक काही घडत नसतं.

इसाक : फार पूर्वी तुम्ही जॉन स्टेनबॅकबद्दल एक लेख लिहिला होता. त्यात तुम्ही म्हटलं होतं की, लेखक म्हणजे त्याचं लिखाण आणि त्याने स्वत:बद्दल रचलेलं मिथक.

नायपॉल : ‘‘लेखक म्हणजे फक्त त्याची पुस्तकं नव्हे. लेखक म्हणजे त्याने स्वत:बद्दल रचलेलं मिथक आहे.’’ मला वाटतं, १९६९ मध्ये मी तो लेख लिहिला होता. हे काळजीपूर्वक रचलेलं वाक्य त्या लेखाची सुरुवात होती.

इसाक : तुमचं स्वत:बद्दलचं मिथक काय आहे?

नायपॉल : माझं कुठलंच मिथक नाही, माझं कुठलंच मिथक नाही. लोक माझ्याबद्दल काय बोलतात हे मला माहीत नाही. मी माझ्याबद्दल छापून आलेलं लिखाण कधीच वाचत नाही.

इसाक : म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, की तुम्ही मिथकाद्वारे नाही तर स्वत:च्या लिखाणाद्वारे ओळखला जाता?

नायपॉल : मी तसा विचारसुद्धा करत नाही. माझ्याबद्दल लोक काय म्हणतात हे मला माहीतच नसल्याने या प्रश्नाचं, तुला आवडेल असं उत्तर मला देताच येणार नाही. माझ्याबद्दल लोक काय बोलतात हे मला खरोखर माहीत नाही. ते कळून घेणं मी टाळतो.

सर व्ही. एस. नायपॉल यांची ‘अरब स्प्रिंग’बद्दलची मते जाणून घेण्यासाठी म्हणून ‘न्यू रिपब्लिक’ या अमेरिकी नियतकालिकाचे तत्कालीन ज्येष्ठ प्रतिनिधी इसाक चोटिनर यांनी त्यांची मुलाखत घेतली, तेव्हा नायपॉल यांच्या द्वितीय पत्नी नादीरा अल्वी याही तेथे होत्या. ‘न्यू रिपब्लिक’च्या डिसेंबर २०१२च्या अंकात प्रकाशित झालेल्या या संपूर्ण मुलाखतीचा अनुवाद विश्राम गुप्ते यांनी केला आणि ‘खेळ’ या मराठी नियतकालिकाने तो २०१३ मध्ये छापला. त्या मुलाखतीचा हा संपादित अंश :